ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशासह महाराष्ट्र राज्यात लॉक डाऊन करण्यात आला आणि सर्व व्यवसाय ठप्प झाले. सध्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव असला तरीही अनलॉकची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने टप्प्या टप्याने सर्व सेवा सुरळीत करण्यात येत आहेत. परंतु, अद्यापही मागील चार महिन्यांपासून बंद असलेली जिम अजूनही सुरु झालेली नाही आहेत. या पार्श्वभूमीवर जिम मालकांनी आज मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी कृष्णकुंजवर भेट घेतली आहे.
यावेळी राज ठाकरे यांनी ‘तुम्ही जिम ओपन करा, बघू काय होतं.’ असा सल्ला जिम मालकांना दिला आहे. पुढे याबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ‘विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझे बोलणे झाले आहे. त्यांचेही हेच म्हणणे आहे की, जिम सुरु झाली पाहिजेत. आता मी सांगतो, जिम सुरु करा, ज्याला यायचे आहे, तो जिमला येईल. बघू काय होते’.
पुढे ते म्हणाले की, ‘किती दिवस लॉक डाऊनमध्ये काढणार आहात? केंद्र सरकार सांगते आहे, जिम, विमानतळ सुरू करा, मात्र राज्य म्हणते आम्ही नाही सुरू करणार. मग तुम्हाला काही वेगळे अक्कल आहे का असा सवाल राज ठाकरे यांनी यावेळी केला.
पुढे ते म्हणाले, जिम सुरू केल्यावर प्रत्येकाने आपली काळजी घ्या, प्रत्येकाची काळजी घ्या. केंद्राने जारी केलेल्या गाईडलाईन्स दिल्या आहेत, त्या पाळून काळजी घ्या.’ असे आवाहनही राज ठाकरे यांनी यावेळी केले.









