प्रतिनिधी /मडगाव :
मडगाव पालिकेतील रोजंदारीवरील एका महिला कर्मचाऱयाने नगराध्यक्षा पूजा नाईक यांच्या आदेशाचे पुन्हा पालन न करता मुख्याधिकाऱयांच्या कक्षात बसण्यास सुरुवात केल्याने गुरुवारी सकाळी नगराध्यक्षा चांगल्याच भडकल्या व त्यांनी मुख्याधिकाऱयांच्या कक्षाला धडक देऊन सदर कृतीबद्दल मुख्याधिकाऱयांना चांगलेच सुनावल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. यासंदर्भात नगराध्यक्षा नाईक यांना विचारले असता त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला.
सदर रोजंदारीवरील महिला कर्मचारी मुख्याधिकारी कक्षात संगणकावर टंकलेखन करण्याचे काम करते. दरम्यानच्या काळात मुख्याधिकारी अजित पंचवाडकर यांच्याविरुद्ध पालिकेच्या अन्य एका कायमस्वरूपी महिला कार्मचाऱयाचा विनयभंग केल्याची तक्रार नगराध्यक्षांकडे आल्यानंतर या रोजंदारीवरील महिला कर्मचाऱयाची अन्य विभागात बदली करण्याचे निर्देश नगराध्यक्षांनी मुख्याधिकाऱयांना दिले होते. मात्र पंचवाडकर यांनी या निर्देशाकडे दुर्लक्ष केले होते. नंतर नगराध्यक्षांनी सदर रोजंदारीवरील कर्मचाऱयाला मुख्याधिकाऱयांच्या कक्षाच्या आंत न बसता कक्षाबाहेरील टेबलावर बसून तेथील संगणकावर काम करण्यास सांगितले होते. पण सदर महिलेने नगराध्यक्षांचे हे निर्देश धुडकावले होते.
नगराध्यक्षांनी नंतर पालिका कायद्यातील कलमांचा वापर करून स्वतः सदर रोजंदारीवरील महिला कर्मचाऱयाच्या बदलीचा आदेश काढला होता आणि खाली नागरिकांकडून येणारे अर्ज व इतर बाबींच्या ‘एंट्री’चे काम तिच्याकडे सोपविले होते. सदर आदेशाची प्रत घेण्यासाठी या महिलेला नगराध्यक्षा नाईक यांनी आपल्या कक्षात बोलाविले असता आदेशाच्या प्रतीचा चुराडा करून नगराध्यक्षांच्या कक्षात फेकून देण्याची कृती तिने केली होती. तसेच त्यावेळी नगराध्यक्षांना मिळेल तसे ती बोलली होती. नगराध्यक्षांनी यासंदर्भात पालिका संचालकांना पत्र लिहून या रोजंदारीवरील महिला कर्मचाऱयावर कारवाईची मागणी केली होती.
काऊंटरवर नसल्याचे पाहून पारा चढला
गुरुवारी सकाळी पालिकेत एन्ट्री काऊंटरवर सदर महिला उपस्थित न राहिल्याने तेथे लोकांच्या रांगा लागल्याची तक्रार नगराध्यक्षा नाईक यांच्याकडे आली असता त्यांनी तेथे जाऊन खातरजमा केली. यावेळी तेथे कोणीच नसल्याचे त्यांच्या नजरेस आले. सदर जागेवर नेमलेली रोजंदारीवरील महिला कर्मचारी मुख्याधिकाऱयांच्या कक्षात बसून असल्याचे कळल्यावर नगराध्यक्षा चांगल्याच भडकल्या व त्यांनी मुख्याधिकारी पंचवाडकर यांच्या कक्षाकडे मोर्चा वळविला. तोपर्यंत प्रसारमाध्यमांचे काही प्रतिनिधी तेथे आल्याचे नजरेस आल्यावर सदर महिला कर्मचारी मुख्याधिकाऱयांच्या कक्षातून पळत एंट्री काऊंटरजवळ आली. यावेळी ज्यांच्यावर कर्मचाऱयांच्या हजेरीची व कोणी रजेवर गेल्यास त्या जागी अन्य कर्मचाऱयाची नियुक्ती करण्याची जबाबदारी सोपविलेली आहे त्या मुख्य कारकुनाला नगराध्यक्षांनी चांगलेच फैलावर घेतले. असे प्रकार यापुढे खपवून घेणार नसल्याचे सांगून नाईक यांनी त्यांना तंबी दिली.









