वार्ताहर / आवळी बुद्रुक
राधानगरी तालुक्यातील आणाजे येथे राहत्या घराची भिंत कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्घटना आज सकाळी साडेनऊच्या दरम्यान घडली.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आनंदा ज्ञानू जाधव ( वय ६५) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. जाधव हे सकाळी उसाचे वाडे घेऊन जनावरांच्या गोठ्यात जात होते. दरम्यान पश्चिमेकडील दगड, माती, विटांची कच्ची भिंत अंगावर कोसळून ते ढिगार्यात गाडले गेले. ही दुर्घटना घडल्यानंतर आनंदा पाटील, प्रदीप पाटील, शंकर जाधव यांच्यासह नागरिकांनी त्यांना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी सरपंच मोहन पाटील, पोलीस पाटील संदीप पाटील, तलाठी, ग्रामसेवक यांनी भेट देऊन पंचनामा केला. सोळांकूर येथे शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची नोंद राधानगरी पोलिसात झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, मुली असा परिवार आहे.









