भारतीय कर्णधार विराट कोहलीचे प्रतिपादन, न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी इशांत, पृथ्वी शॉला संधी देण्याचे संकेत
वेलिंग्टन / वृत्तसंस्था
कसोटी, वनडे व टी-20 या सर्वही क्रिकेट प्रकारात सातत्याने खेळणे कष्टप्रद आहे, यामुळे येणारा अतिरिक्त भार त्रासदायक असतो. पण, पुढील आणखी किमान तीन वर्षे तरी या तिन्ही क्रिकेट प्रकारात खेळण्याचा माझा प्रयत्न असेल, असे प्रतिपादन भारतीय कर्णधार विराट कोहलीने केले. भारत-न्यूझीलंड यांच्यात उद्यापासून (शुक्रवार दि. 21) पहिली कसोटी खेळवली जाणार असून त्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत तो बोलत होता.
पुढील 3 वर्षात 2 टी-20 विश्वचषक स्पर्धा तर 1 वनडे विश्वचषक स्पर्धा होत असून त्यावर विराटचे मुख्य लक्ष केंद्रित आहे. त्यानंतर तो तीनपैकी कोणत्या दोन क्रिकेट प्रकारात खेळत राहील, याचा निर्णय घेईल, असे सध्याचे संकेत आहेत.
‘पुढील तीन वर्षात संघाला सातत्याने खेळायचे आहे, एकंदरीत तीन विश्वचषक स्पर्धा असणार आहेत आणि त्या दृष्टीने मी स्वतःची तयारी करत आहे. आता अति क्रिकेट हा एक भाग आहेच आणि त्याबद्दल मला काहीही लपवून माझे मत मांडायचे नाही. मी स्वतः 8 वर्षांपासून या प्रवाहात आहे आणि एका वर्षात किमान 300 दिवस खेळत आलो आहे. यात प्रवास व सराव सत्राचा समावेश आहे. साहजिकच, हा अति भार आहे. पण, आम्ही खेळाडू केवळ या एकाच बाबीचा विचार करणे टाळतो आणि जेथे गरज वाटते, तेथे विश्रांती घेण्याला प्राधान्य देतो’, असे विराट पुढे म्हणाला. 2021 नंतर तीनपैकी एका क्रिकेट प्रकारातून निवृत्त होण्याचा तुझा विचार आहे का, या प्रश्नावर तो बोलत होता.
जेव्हा शरीर अधिक जबाबदारी सोसणार नाही, त्यावेळी, मी 34 किंवा 35 वर्षांचा असताना वेगळा विचार करावा लागेल. त्यावेळी वेगळय़ा प्रकारचा संवाद होऊ शकतो. मात्र, पुढील तीन वर्षात मला अशा कोणत्याही समस्या नसतील’, असा आत्मविश्वास त्याने येथे व्यक्त केला.
इशांत, पृथ्वीचा समावेश जवळपास निश्चित
दरम्यान, न्यूझीलंडविरुद्ध होणाऱया पहिल्या कसोटी सामन्यासाठी अंतिम संघात इशांत शर्मा व पृथ्वी शॉ यांचा सहभाग जवळपास निश्चित असल्याचे संकेत विराटने दिले. बुधवारी सराव सत्रात वृद्धिमान साहाने यष्टीरक्षणाचा सराव केला. त्यामुळे, पंतऐवजी त्याच्याकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी असेल, असाही होरा आहे.
विदेशात कसोटी खेळत असताना हनुमा विहारी सहाव्या स्थानी फलंदाजीला उतरतो. येथे तो गोलंदाजीतील पाचवा पर्याय म्हणूनही विचारात घेतला जात आहे. बुमराह, शमी व इशांत तीन स्पेशालिस्ट मध्यमगती-जलद गोलंदाज असतील तर एकमेव फिरकीपटूच्या जागेसाठी रविचंद्रन अश्विन व रविंद्र जडेजा यांच्यात रस्सीखेच रंगेल. असे संकेत आहेत. अश्विन स्पेशालिस्ट फिरकीपटू आहे तर जडेजा उत्तम अष्टपैलू खेळाडू असल्याने संघव्यवस्थापन यांच्यापैकी कोणाची निवड करणार, हे पाहणे औत्सुक्याचे असेल.
रणजी सामन्यादरम्यान गुडघा दुखावल्यानंतर तीन आठवडे विश्रांती घ्यावी लागलेल्या इशांतने येथे बुधवारी पूर्ण जोशात सराव केला आणि विराट कोहलीने तो अपेक्षित टप्प्यावर उत्तम मारा करत असल्याची पोचपावतीही दिली. हा सामना जोहान्सबर्गमध्ये असता तर आम्ही चार जलद गोलंदाज खेळवले असते. पण, येथे आमचे तीन जलद गोलंदाज प्रतिस्पर्धी संघ सहज गारद करु शकतात, असा विश्वास विराटने पुढे व्यक्त केला.
संभाव्य अंतिम संघ
सलामीवीर : मयांक अगरवाल व पृथ्वी शॉ
मध्यफळी : चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी.
यष्टीरक्षक : वृद्धिमान साहा.
फिरकीपटू किंवा अष्टपैलू : रविचंद्रन अश्विन किंवा रविंद्र जडेजा
जलद-मध्यमगती गोलंदाज : जसप्रित बुमराह, मोहम्मद शमी, इशांत शर्मा.
पहिल्या कसोटीसाठी न्यूझीलंड संघात मॅट हेन्रीला पाचारण
वेलिंग्टन : भारताविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यासाठी न्यूझीलंडने बुधवारी जलद गोलंदाज मॅट हेन्रीला पाचारण केले. नील वॅग्नर आपल्या पहिल्या अपत्याच्या प्रतीक्षेत असल्याने त्याला पर्यायी खेळाडू म्हणून हेन्रीला अंतिम क्षणी संघात दाखल होण्याची सूचना केली गेली.
‘वॅग्नर पहिल्या कसोटीसाठी वेलिंग्टनमध्ये संघात दाखल होणार नाही. त्याची पत्नी लॅना पहिल्या अपत्याच्या प्रतीक्षेत आहे. टौरंगा येथेच ते असतील. पर्यायी खेळाडू या नात्याने मॅट हेन्री संघात दाखल झाला आहे’, असे किवीज संघाने ट्वीटरवर नमूद केले.
वॅग्नर हा ट्रेंट बोल्ट व टीम साऊदी यांच्यासह न्यूझीलंडच्या जलद गोलंदाजीचा मुख्य कणा असून यापैकी डावखुऱया वॅग्नरने विशेषतः कसोटीत अधिक प्रभावी गोलंदाजी साकारली आहे. आतापर्यंत खेळलेल्या 47 सामन्यात त्याने 26.63 च्या सरासरीने 204 बळी घेतले आहेत. पहिल्या कसोटीसाठी काईल जेमिसन पदार्पणाच्या अपेक्षेत आहे तर 12 कसोटी व 52 वनडे खेळलेल्या मॅट हेन्रीचा पर्यायही यजमान संघाकडे आता असणार आहे. अर्थात, हेन्रीला कसोटीत फारसे यश लाभले नसून 12 सामन्यात 30 बळी घेण्यासाठी त्याने 50.16 ची सरासरी नोंदवली आहे.
भारत-न्यूझीलंड कसोटी मालिकेची रुपरेषा
तारीख / लढत / ठिकाण / भारतीय प्रमाणवेळ
दि. 21 ते 25 फेब्रुवारी / पहिली कसोटी / वेलिंग्टन / पहाटे 4 पासून
दि. 26 फेब्रु. ते 4 मार्च / दुसरी कसोटी / ख्राईस्टचर्च / पहाटे 4 पासून









