कोरोनाचा सावंतवाडी तालुक्यातही शिरकाव : कारिवडेत आढळले दोन रुग्ण : तिरवडे, उंबर्डे, शिवडाव, पणदूर येथेही आढळले पॉझिटिव्ह रुग्ण
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
लॉकडाऊनचा चौथा टप्प्यात मोठी शिथिलता दिल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हय़ात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. गुरुवारी एका दिवसात कोरोना पॉझिटिव्हचे सात रुग्ण आढळले आहेत. गेल्या सहा दिवसात 15 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्हय़ात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 24 झाली आहे. नव्याने आढळलेल्या सात रुग्णांमध्ये कुडाळ तालुक्यातील पणदूर येथील दोन, वैभववाडी तालुक्यातील तिरवडे येथील एक व उंबर्डे येथील एक, कणकवली तालुक्यातील शिवडाव येथील एक आणि सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे येथील दोन रुग्णांचा यात समावेश आहे. सर्व रुग्ण मुंबई प्रवास करून आलेले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांनी दिली.
दरम्यान, जिल्हय़ात नव्याने रुग्ण आढळल्यानंतर त्या-त्या गावांमध्ये आरोग्य खात्यामार्फत सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोधही घेण्यात येत आहे. जिल्हय़ात सध्या कणकवली तालुक्यातील शिवडाव, डामरे, वैभववाडी तालुक्यातील ब्राह्मणदेववाडी, भोगरेवाडी आणि उंबर्डे, सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे, कुडाळ तालुक्यातील पणदूर-मयेकरवाडी आणि मालवण तालुक्यातील हिवाळे असे कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहेत.
संपूर्ण देशभरात कोरोनाचे संकट ओढवल्यानंतर 23 मार्चपासून देशभरात संचारबंदी सुरू झाली आणि 25 मार्चला कोरोनाचा पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला होता. त्यानंतर 29 एप्रिलला दुसरा रुग्ण सापडला. तोपर्यंत महिनाभर कोरानाचा रुग्ण सापडला नव्हता. विशेषत: सिंधुदुर्ग जिल्हय़ातील जनतेने संचारबंदीचे काटेकोर पालन केले व संयम राखल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला नाही. 29 एप्रिल ते 14 मे या कालावधीत आठ रुग्ण सापडले. त्यानंतर 22 मेपर्यंत नवीन रुग्ण सापडले नव्हते. मात्र 23 मे रोजी एकाच दिवशी आठ आणि रविवारी एक पॉझिटिव्ह रुग्ण सापडला होता. त्यानंतर सहाव्या दिवशी पुन्हा एकाच दिवशी कोरोना पॉझिटिव्ह सात रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्हय़ात आतापर्यंत कोरोनाचे 24 रुग्ण आढळले आहेत. त्यातील सात रुग्ण कोरोनामुक्त झाले असून उर्वरित 17 रुग्णांवर जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत.
एका दिवसात आढळले सात रुग्ण
जिल्हय़ात गुरुवारी एका दिवसात सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. बुधवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालामध्ये दोन, तर गुरुवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये पाच रुग्णांचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आला. दोडामार्ग वगळता आता सर्वच तालुक्यांत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.
कारिवडे येथे दोन रुग्ण
सावंतवाडी तालुक्यात एकही रुग्ण नव्हता. पहिल्यांदाच सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे गावात कोरोना पॉझिटिव्ह दोन रुग्ण आढळले आहेत. 33 वर्षीय आणि 39 वर्षीय अशा दोन तरुणांचा यात समावेश आहे. दोन्ही रुग्ण हे पालघर-विरार येथून आले आहेत. त्यांचा स्वॅब 26 मे रोजी घेण्यात आला होता. दोघेही संस्थात्मक विलगीकरणामध्ये होते. पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर दोघांनाही जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
कुडाळ तालुक्यातील दोघे रुग्ण
कुडाळ तालुक्यातील पणदूर गावात दोन रुग्ण आढळले आहेत. यात 50 वर्षीय महिला व 21 वर्षीय युवतीचा समावेश आहे. आई व मुलगीचा समावेश आहे. दोन्ही पॉझिटिव्ह रुग्ण पणदूर हायस्कूलमध्ये संस्थात्मक विलगीकरणामध्ये होती. पणदूर येथे रविवारी 24 मे रोजी एक 52 वर्षीय महिला पॉझिटिव्ह सापडली होती. याच रुग्णाच्या संपर्कात या दोन्ही रुग्ण आल्या होत्या. 26 मे रोजी त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता. कुडाळ तालुक्यात आतापर्यंत सोनवडे येथे एक, जांभवडे येथे एक, नेरुर येथील एक आणि पणदूर येथील तीन असे सहा रुग्ण आढळलेले आहेत.
कणकवली तालुक्यात आढळला एक रुग्ण
कणकवली तालुक्यातील शिवडाव येथील 22 वर्षीय युवक कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. पणदूर येथे रविवारी आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात तो आला आहे. याचा स्वॅब 25 मे रोजी घेण्यात आला होता. दरम्यान कणकवली तालुक्यात आतापर्यंत नडगिवे येथे एक, डामरे येथे चार, ढालकाठी येथे एक आणि आज आढळलेला शिवडावमधील एक मिळून एकूण आठ रुग्ण आढळले आहेत.
वैभववाडीत दोन रुग्ण
वैभववाडी तालुक्यातील तिवरडे येथील 58 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. हा रुग्ण विरार येथून आला होता व 25 मे रोजी त्याचा स्वॅब घेण्यात आला होता. हा रुग्ण परत मुंबईला गेला असल्याचे समजते. तसेच उंबर्डे येथील 33 वर्षीय एक तरुण कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. हा रुग्ण पनवेल येथून आला आहे. त्याचा स्वॅब 26 मे रोजी घेण्यात आला होता. वैभववाडी तालुक्यात यापूर्वी नाधवडे येथे एक रुग्ण आढळला होता. त्यामुळे या तालुक्यात तीन रुग्ण झाले आहेत.
सातही रुग्णांचे मुंबई कनेक्शन
गुरुवारी आढळलेल्या सातही कोरोना बाधित रुग्णांचे मुंबई कनेक्शन आहे. सर्व रुग्ण मुंबई शहरातून वेगवेगळय़ा ठिकाणाहून प्रवास करून आलेले आहेत. त्यांना संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले होते. कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर सर्वांना जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांकडून देण्यात आली.
कोरोना पॉझिटिव्हची संख्या वाढण्याची भीती
कोरोनाचे संकट ओढवल्यानंतर सिंधुदुर्गात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात होती. एप्रिल अखेरपर्यंत एकच रुग्ण आढळला होता. त्यानंतर जशी लॉकडाऊनमध्ये शिथिलता येत गेली आणि मुंबईसारख्या रेडझोनमधून जिल्हय़ाबाहेरील लोक येऊ लागले, त्याप्रमाणे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. 24 मार्च ते 29 एप्रिल या एक महिन्यात एक रुग्ण आणि 29 एप्रिल ते 28 मे या एक महिन्यात 23 रुग्ण आढळले आहेत. जिल्हय़ाबाहेरून 87 हजाराहून जास्त लोक आल्याने कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तात्काळ आरोग्य खात्याशी संपर्क साधा – के. मंजुलक्ष्मी
सिंधुदुर्ग जिल्हय़ात आतापर्यंत कोरोनाचे 24 रुग्ण आढळले. त्यामधील बहुतांश रुग्ण हे मुंबई-पुणे येथून प्रवास करून आलेले आहेत. त्यामुळे जिल्हय़ात कोरोना संक्रमणाचा टप्पा ओलांडला गेलेला नाही. जिल्हय़ातील नागरिकांनी लॉकडाऊन काळात चांगला संयम पाळला. त्यामुळे जिल्हय़ात कोरोनाचा संसर्ग रोखला गेला. त्यामुळे जिल्हय़ातील सर्व नागरिकांचे तसेच प्रशासकीय यंत्रणेचे आभार व्यक्त करते. यापुढेही कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे. तसेच जिल्हय़ात कोरोनाचे रुग्ण सापडत असले, तरी कुणीही घाबरून जाऊ नये. जिल्हय़ाबाहेरून येणाऱया लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसल्यास तात्काळ आरोग्य खात्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.









