इराकवर 30, फिलिपाईन्सवर 25 टक्के कर
► वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी आणखी सहा देशांमध्ये नवीन कर दर जाहीर केले आहेत. फिलिपाईन्स, इराक, मोल्दोव्हा, अल्जेरिया, लिबिया आणि ब्रुनेईवर 25 ते 30 टक्के कर जाहीर करण्यात आला आहे. नव्या करप्रणालीचा हा आदेश 1 ऑगस्टपासून लागू होईल. यापूर्वी अमेरिकेने दक्षिण कोरिया आणि जपानसह 14 देशांवर कर लादला होता. ट्रम्प यांनी या देशांच्या नेत्यांना पाठवलेल्या अधिकृत पत्रात करासंबंधीची माहिती शेअर केली आहे. दुसऱ्या टप्प्यातील करांचा सर्वाधिक दर 30 टक्के असून तो इराक, अल्जेरिया आणि लिबियावर लादला गेला आहे. भारताबाबत बुधवारी रात्रीपर्यंत कोणताही निर्णय जाहीर करण्यात आला नव्हता.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी मध्यरात्रीनंतर बांगलादेश-जपानसह 14 देशांवर कर वाढवण्याची घोषणा केली होती. ट्रम्प प्रशासनाने संबंधित देशांना पत्र पाठवून या निर्णयाची औपचारिक माहिती दिली. या निर्णयाअंतर्गत काही देशांवर 25 टक्के, तर काहींवर 30 ते 40 टक्क्यांपर्यंत भार लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. हे कर 1 ऑगस्टपासून लागू केले जाणार असल्याचेही ट्रम्प यांनी जाहीर केले आहे.








