दावोस परिषदेत पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन : संशोधनाला अधिकाधिक चालना
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारत लवकरच अनेक नव्या लसी उपलब्ध करणार आहे, असे आश्वासक प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. या सर्व लसी भारतनिर्मित असतील. सध्या भारताच्या दोन लसी अनेक देशांमध्ये निर्यात केल्या जात असून त्यात लवकरच आणखी उत्कृष्ट लसींची भर पडणार आहे. कोरोनाशी युद्ध भारत केवळ भारतातच नव्हे, तर जगात सर्वत्र करणार आहे, असेही उद्गार त्यांनी दावोस येथील आर्थिक परिषदेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भाग घेताना काढले. या परिषदेत अनेक देश भाग घेत आहेत.
भारतात कोरोनाचा हाहाकार सर्वाधिक असेल असे भाकित गेल्या फेब्रुवारी-मार्चमध्ये अनेकांनी केले होते. काही जणांनी भारतात 70 के 80 कोटी लोकांना कोरोना होण्याची शक्यता व्यक्त केली होती. तर काही जणांनी भारतात कोरोनामुळे 20 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होईल, अशीही शक्यता व्यक्त केली होती. तथापि, सरकारचे प्रयत्न आणि भारतीयांचे सहकार्य यामुळे भारतात स्थिती नियंत्रणात राहिली. कोरोना विरुद्धच्या संघर्षाला लोकसंघर्षात रुपांतरीत करण्यात यशस्वी ठरलो, असा अभिमानही त्यांनी व्यक्त केला.
लसीकरणात आघाडीवर
लस उपलब्ध झाल्यानंतर त्वरित भारतात लसीकरणाचा कार्यक्रम व्यापक प्रमाणात सुरू करण्यात आला. आतापर्यंत गेल्या 12 दिवसांमध्ये 23 लाख लोकांचे लसीकरण करण्यात आले. हा वेग आणि ही संख्या जगात सर्वात अधिक आहे. त्यामुळे लसीकरणातही भारताने जगात आघाडी घेतली असून जगाने याची नोंद घेतली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
सर्व आव्हानांना परतविण्याची क्षमता
वर्ष 2020 मध्ये भारताने, कोरोना असो वा अर्थव्यवस्था, सर्व आव्हानांना भिडण्याची क्षमता सिद्ध केली आहे. सरकारने वेळीच योग्य त्या उपाययोजना केल्याने हे साध्य झाले. लोकांची मानसिक शक्ती वाढविणे हे सर्वात मोठे आव्हान होते. तेही आम्ही पेलले. लडाख येथे सध्या चीनशी संघर्ष सुरू आहे. आम्ही चीनलाही पूर्ण सामर्थ्यानिशी तोंड देत आहोत. लसींप्रमाणेच शस्त्रास्त्रांमध्येही ‘आत्मनिर्भर’ होण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत, असेही प्रतिपादन त्यांनी पेले.









