पंतप्रधान मोदींची घोषणा, 20 एप्रिलपर्यंत निर्बंध अधिकच कठोर, नंतर स्थितीनुसार सौम्यता
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी लॉकडाऊनमध्ये 3 मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. ही घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सकाळी 10 वाजता राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात केली. 20 एप्रिलपर्यंत देशातील स्थितीचे सूक्ष्मपणे अवलोकन पेले जाईल. तोवेळपर्यंत ज्या भागांमध्ये कोरोना संसर्ग समाधानकाररित्या नियंत्रणात आला असेल, तेथे निर्बंधांमध्ये सौम्यता आणली जाईल, असेही धोरण त्यांनी घोषित केले. गेले 21 दिवस ज्या कोटय़वधी लोकांनी अनेक समस्यांना तोंड देत लॉकडाऊनचे पालन केले, त्यांची त्यांनी प्रशंसा केली. मात्र नियमांचे पालन न करणाऱया नाठाळांनाही त्यांनी खडे बोल सुनावले. लॉकडाऊनच्या काळात जनतेने पाळावयाच्या ‘सप्तसूत्री’ची घोषणाही त्यांनी केली.
‘गेले 21 दिवस कोटी कोटी लोकांनी सर्व त्रास आणि अडचणी सहन करून लॉकडाऊनचे पालन केले आहे. यामुळे देशातील परिस्थिती बऱयाच प्रमाणात आटोक्यात राहिली आहे. इतर देशांच्या तुलनेत आपल्याकडे रुग्ण आणि मृत्यूंचे प्रमाण नियंत्रणात आहे. लॉकडाऊनमुळे मोठय़ा आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. केवळ आर्थिक दृष्टीने विचार करता हा कालावधी त्रासदायक आहे हे निश्चित. तथापि, सहस्रावधी लोकांचे जीव वाचविण्यासाठी असा कठोर निर्णय घेणे अनिवार्य होते, हे सुद्धा जनता चांगल्याप्रकारे जाणते, अशा शब्दांमध्ये त्यांनी परिस्थितीची जाणीव देशवासियांना स्पष्टपणे करून दिली.
प्राधान्य गरीब, कष्टकरी जनतेला…
देशात अन्नधान्ये, औषधे आणि जीवनावश्यक वस्तूंचा कोणताही तुटवडा नाही. त्यामुळे लोकांनी चिंता करू नये. लॉकडाऊनच्या काळात देशातील गरीब आणि कष्टकरी वर्गाला कमीत कमी त्रास व्हावा याची दक्षता घेण्यात येत आहे. अशा लोकांचा प्राधान्याने विचार सरकारने केला आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
तर पुन्हा निर्बंध…
लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढवावा, अशी मागणी राज्य सरकारांकडून केली गेली होती. काही राज्यांनी या आधीच कालावधी वाढीची घोषणाही केली. राज्यांकडून आलेल्या सूचनांचा सविस्तर विचार करून लॉकडाऊनचा कालावधी आणखी 19 दिवस, अर्थात 3 मे पर्यंत वाढविण्यात येत आहे. 20 एप्रिलपर्यंत संपूर्ण देशात अत्यंत कठोर निर्बंधांचे क्रियान्वयन पेले जाईल. या कालखंडात देशाच्या प्रत्येक भागावर केंद्र सरकार बारकाईने लक्ष ठेवणार आहे. देशाचे जे भाग या अग्निपरीक्षेत उत्तीार्ण होतील, तेथे निर्बंध काही प्रमाणात शिथील केले जातील. मात्र निर्बंध सौम्य केल्यानंतर जर पुन्हा त्या भागात कोरोनाचा संसर्ग वाढला तर पुन्हा कठोर निर्बंध लादले जातील, अशा निर्बंधांशिवाय दुसरा पर्याय नाही, हा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी देशवासियांसमोर स्पष्ट केला.
लॉकडाऊन नसता तर…
केंद्र सरकारने अत्यंत उचितवेळी कठोर कारवाई केली आहे. इतर देशांशी आपली तुलना करणे योग्य नाही. तथापि, विकसीत महासत्ता असणाऱया देशांमध्येही जो हाहाकार या विषाणूने माजविला आहे, तो पाहता येथे स्थिती पुष्कळ चांगली आहे. इतर देशांप्रमाणे भारतात लॉकडाऊन करण्यास उशीर केला गेला असता तर भयानक परिस्थिती निर्माण झाली असती, या मुद्दय़ाकडे त्यांनी लक्ष वेधले.
विरोधी पक्षांची टीका
पंतप्रधान मोदींचा हा संदेश केवळ घोषणाबाजी आहे. या संदेशात गरिबांसाठी कोणतीही सुविधा देण्यात आलेली नाही. गरिबांसाठी त्यांनी पॅकेजची घोषणा करावयास हवी होती. ती न करता ते केवळ शब्दांची धूळ उडवित आहेत, अशी टीका विरोधी पक्षांनी, विशेषतः काँगेसने केली आहे. काँगेसच्या अस्थायी अध्यक्षा सोनिया गांधी आणि प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी त्यांच्यावर आरोप केले.
देशवासियांसाठी ‘सप्तसूत्री’…
1. वयस्कर लोकांची विशेष काळजी घ्या. ज्यांना पूर्वीपासूनच असाध्य विकार आहेत, अशा व्यक्तींकडे अधिकच लक्ष द्या. त्यांना सुरक्षित ठेवा.
2. लॉकडाऊनच्या ‘लक्ष्मणरेषे’चे काटेकोरपणे पालन करा. शरीरांतर (सोशल डिस्टन्सिंग) कसोशीने पाळा. घरगुती मुखावरणे उपयोगात आणा.
3. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करा. यासाठी ‘आयुष’ मंत्रालयाने प्रसारित केलेल्या दिशानिर्देशांचे व्यवस्थित व सातत्याने पालन करा.
4. ‘आरोग्य सेतू’ हे मोबाईल ऍप डाऊनलोड करा. इतरांना त्यासाठी उद्युक्त करा. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी हे ऍप अत्यावश्यक आहे.
5. गरीब आणि त्यांच्या कुटुंबांचे उत्तरदायित्व स्वीकारा. विशेषतः त्यांच्या आहार आणि खाण्यापिण्याची काळजी घेऊन त्यांना मोलाचे साहाय्य करा.
6. उद्योग, उत्पादन केंद्रे आणि व्यापारात काम करणाऱया कर्मचारी आणि कामगारवर्गाची विशेष आपुलकीने आणि उदारपणे काळजी घ्या.
7. कामगार व कर्मचाऱयांना कामावरून कमी करू नका. देशभरातील कोरोना योद्धे, डॉक्टर्स, परिचारिका आणि स्वच्छता कर्मचाऱयांना आदर द्या.
‘आयुष’ मंत्रालयाच्या मार्गदर्शन सूचना…
ड दिवसभर आणि आवश्यकता भासेल तेव्हा गरम पाणीच प्यावे.
ड योगासने, प्राणायाम आणि साधना किमान 30 मिनिटे करावी.
ड हळद, जिरे, धने आणि लसूण यांचा आहारात समावेश करावा.
ड प्रतिदिन सकाळी 10 ग्रॅम (चमचाभर) च्यवनप्राश सेवन करावे.
ड मधुमेह असणाऱया व्यक्तींनी शर्करामुक्त च्यवनप्राशचे सेवन करावे.
ड तुळस, दालचिनी, मिरी, सुंठ, मनुका, आलेयुक्त हर्बल चहा प्यावा.
ड 150 मि.ली. दुधात अर्धा चमचा हळद घालून दोनदा प्राशन करावे.
नाकासाठी उपाय…
ड दोन्ही नाकपुडय़ांमध्ये सकाळ व रात्री दोन थेंब शुद्ध खोबरेल किवा तूप घालावे. यामुळे नाकपुडय़ा मोकळय़ा होतात.
ड तोंडात एक चमचा खोबरेल किवा तिळाचे तेल घेऊन पाण्याने चुळा भराव्यात. नंतर गरम पाण्याने चुळा भराव्यात.
ड पुदिन्याची पाने किवा ओव्याची पाने उकळून वाफ घ्यावी. असे दिवसभरात दोनदा केल्यास कोरडा खोकला कमी होतो.
काय आहे ‘आरोग्य सेतू’ ऍप…
ड कोरोना विषाणूचा प्रसार कसा होतो, हा संसर्ग का गंभीरपणे घेतला पाहिजे आणि त्याची माहिती प्रत्येकाला असणे का आवश्यक आहे, हे समजून देणे हा या ऍपचा प्रमुख हेतू आहे. कोरोनाविरूद्ध जनजागृतीसाठी हे ऍप आहे.
ड यात एक प्रश्नावली आहे. त्या प्रश्नांची उत्तरे आपण दिल्यास आपल्या आरोग्याची स्थिती कळू शकते. आपल्या कोरोना झाल्याची शंका असल्यास तिचे समाधान करण्यासाठी हे ऍप उपयुक्त असल्याचे सांगण्यात आले आहे.
ड कोरोना विषाणूच्या सांसर्गाची आणि त्यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी या ऍपमधून मार्गदर्शन केले जाते. हे ऍप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करावे व इतरांनाही करण्यास सांगावे असे आवाहन आहे.
ड हे ऍप सध्या इंग्रजी, हिंदी, तेलगु, कन्नड, मल्याळम, मराठी, गुजराथी, तामिळ, ओरिया, बंगाली व पंजाबी अशा 11 भाषांमध्ये उपलब्ध आहे. भारताच्या कानाकोपऱयात राहणाऱयांना ते समजावे म्हणून ते बहुभाषी केले आहे.
डॉ. आंबेडकरांची आठवण…
भारताच्या घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज जन्मदिन आहे. कोरोनाविरूद्धचे हे युद्ध एकात्मतेच्या सामर्थ्यावर लढून आपण सर्वजण डॉ. आंबेडकरांच्याच शिकवणीचे पालन करीत आहोत, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. आंबेडकरांचे आदरयुक्त स्मरण केले.
पंतप्रधान मोदींचा संदेश 15 वाक्यात…
ड कोरोनाविरूद्धच्या युद्धात भारतीयांकडून अभूतपूर्व संयम, सामथ्याचे दर्शन
ड कोरानावर लॉकडाऊन हाच अनिवार्य उपाय, तो केल्याखेरीज पर्याय नाही
ड कोरोनावर निर्णायक घाव घालण्याचा प्रयत्न म्हणून लॉकडाऊनमध्ये वाढ
ड 20 एप्रिलपर्यंत निर्बंध अतिशय कठोर राहणार, देशावर लक्ष ठेवले जाणार
ड प्रत्येक जिल्हा प्रशासनाकडून, पोलिसांकडून तासागणिक अहवाल मागविणार
ड त्यानंतर ज्या भागांमध्ये सुधारणा असेल तेथे निर्बंध काहीसे शिथील होणार
ड निर्बंध शिथील केलेल्या भागांमध्ये नंतर संसर्ग आढळल्यास पुन्हा निर्बंध
ड कोरोना हॉटस्पॉटच्या संख्येत वाढ हे देशासाठी चांगले लक्षण मुळीच नाही
ड अतोनात आर्थिक हानी सोसावी लागली तरी शेवटी लोकांचा जीव महत्वाचा
ड जग बेसावध होते तेव्हाच भारताने कोरोनाविरोधात उपाय सुरू केले होते
ड प्रगत देशांच्याही तुलनेत भारतात कोरोना परिस्थिती पुष्कळच चांगली आहे
ड लोकांना 21 दिवस अतिशय कष्ट पडले, पण सरकारसमोर पर्याय नव्हताच
ड आणखी 19 दिवस अशीच कळ सोसल्यास कोरोनावर विजय शक्य होणार
ड अद्यापही जाग न आलेल्या काही लोकांविरोधात कठोर कारवाई केली जाणार









