सिएना मिलरसोबत दिसून येणार देसी गर्ल
बॉलिवूडनंतर हॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा लवकरच अमेरिकन कलाकार सिएना मिलरसोबत दिसून येणार आहे. अँथनी चेन यांच्या पुढील हॉलिवूड चित्रपटासाठी प्रियांकाची निवड करण्यात आली आहे. शिल्पी सोमाया गोडा यांची कादंबरी ‘सीक्रेट डॉटर’वर हा चित्रपट आधारित असणार आहे. या चित्रपटासाठी अमेझॉन स्टुडिओसोबत चर्चा सुरू असून प्रसिद्ध लेखिका श्रुती गांगुली याची पटकथा लिहिणार आहेत.

कादंबरीत दोन महिलांची कहाणी मांडण्यात आली असून ज्या एका मुलाद्वारे परस्परांशी जोडल्या गेलेल्या आहेत. सीक्रेट डॉटरमध्ये समर नावाची विवाहित महिला असून ती सॅन फ्रान्सिस्को येथे राहत असते. आपण कधीच आई होऊ शकणार नाही हे कळल्यावर ती भारतातील एका मुलीला दत्तक घेत असल्याचे दर्शविण्यात येणार आहे.
प्रियांका चोप्रा या चित्रपटासह अमेझॉनची वेबसीरिज ‘सिटाडेल’, रोमँटिक चित्रपट ‘टेक्स्ट फॉर यू’ आणि ऍक्शन चित्रपट ‘एंडिंग थिंग्स’मध्ये दिसून येणरा आहे. याचबरोबर प्रियांकाने फरहान अख्तरचे दिग्दर्शन असलेला चित्रपट ‘जी ले जरा’ देखील स्वीकारला आहे. या चित्रपटात कॅटरिना कैफ आणि आलिया भट्ट देखील दिसून येणार आहे.









