दुपारी 2 ते सायं.5 वा. विसर्जन
प्रतिनिधी / फोंडा
पाच दिवसांच्या गणपती विसर्जन मिरणुकीची अनोख परंपरा असलेल्या फोंडा तालुक्यातील आडपई गावात यंदाच्या वर्षी कुठलाच उत्साह व जल्लोषाविना साध्या पद्धतीनेच विसर्जन सोहळा होणार आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमिवर सामाजिक सुरक्षा व सरकारी मार्गदर्शन तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याचा निर्णय येथील दहाजण समाजाने घेतला आहे.
आडपईतील ही विसर्जन मिरणूक केवळ फोंडा तालुकाच नव्हे तर संपूर्ण गोव्यात प्रसिद्ध आहे. फुगडय़ा व चित्ररथ देखावे हे या मिरवणुकीचे खास आकर्षण असते. भाविकांना यंदा हा मिरवणुकीचा उत्साह व आनंद लुटता येणार नाही. चित्ररथ देखाव्यांसह भव्य मिरवणूक काढून पाच दिवसांच्या गणपतीचे थाटामाटात विसर्जन करण्याची परंपरा गेली अनेक वर्षे आडपई गावाने जपली आहे. पौराणिक प्रसंग व सामाजिक विषयांवर संदेश देणारे आकर्षक देखावे, दिंडी, फुगडय़ा अशा उत्साहपूर्ण वातावरणात गणपती बाप्पाला दरवर्षी ग्रामस्थ मोठय़ा जल्लोषात निरोप देतात. गावातील कलाकारांमधील कलागुणांचे दर्शन त्यातून घडते. या आनंद सोहळात सहभागी होण्यासाठी राज्य भरातून भाविक गर्दी करतात. कोरोनाच्या संक्रमाणामुळे यंदा या मिरवणुकीत खंड पडल्याने ग्रामस्थांबरोबरच त्यांच्या सग्यासोयऱयांचा निरुत्साह झाला आहे.
आडपई गावात घरोघरी गणपती पुजण्याची प्रथा नाही. येथील पंधरा ते सोळा मोठी कुटुंबे एकत्र येऊन सामुहिकरित्या गणपती पुजतात. नोकरी व्यावसायानिमित्त विविध भागात स्थायिक झालेले ग्रामस्थ चतुर्थीचे पाच दिवस आवर्जून आपल्या मूळ घरी येतात. त्यामुळे संपूर्ण गाव गजबजून जातो. खुमणेभाटकर, कुर्डीकर, म्हार्दोळकर, वस्त, सकले मुळे, वयले मुळे, बोरकर, सोसेभाटकर, लोटलीकर, खांडेकर, महालक्ष्मी, पोकळे, श्री शिवंबा निवास आदी कुटुंबियांचा त्यात समावेश आहे. यंदा आडपई गावात प्रथेनुसार गणपती पुजले आहेत. मात्र दरवर्षी असणारा उत्साह फारसा दिसत नाही. रस्त्यावर उभारणाऱया कमानी, रोषणाई व सजावटही फारशी दिसत नाही. बुधवार 26 ऑगस्ट रोजी गावातील गणपतींचे विसर्जन होणार आहे. एरवी मिरवणुकीत सहभागी होणारे प्रत्येक कुटुंबातील गणपती आपल्या ठरल्या क्रमानुसार बाहेर काढले जायचे. यंदा प्रत्येक कुटुंबाला आपल्या सोयीनुसार गणपती विसर्जनाला नेण्याची मुभा आहे. दुपारी 2 ते सायं. 5 वा. यावेळेत विसर्जन होणार आहे. गणपतीसोबत 4 ते 5 कुटुंब सदस्य असतील. दत्त मंडपाजवळ होणाऱया सर्व गणपतींच्या सामुहिक आरत्या होणार नाहीत. शिवाय दिंडी, चित्ररथ देखावे असा कुठलाच कार्यक्रम नसेल, असे दहाजण समाज समितीचे प्रतिनिधी सोमेश नाईक यांनी कळविले आहे.









