भाजप नेते नीलेश राणे यांची शिवसेनेवर टीका
वीज, पाण्यापासून नागरिक वंचित हे आमदारांचे अपयश!
मालवण, देवबाग, वायरी आदी नुकसानग्रस्त भागांची पाहणी
पत्रे, ताडपत्री, जीवनावश्यक वस्तूंचे वितरण
प्रतिनिधी / मालवण:
कोकणाने शिवसेनेला मते दिली, तरी शिवसेनेने कोकणाला काय दिले? आठ दिवस उलटून गेले, तरी वादळग्रस्तांना मदत जाहीर होत नाही. आमदार वैभव नाईक यांना प्रशासनात काडीची किंमत नाही, अधिकारी भीक घालत नाहीत. आठ-आठ दिवस वीज, पाणी या मूलभूत गरजांपासून नागरिक वंचित आहेत. शिवसेनेकडून जनतेला अपेक्षा नाहीत. त्यामुळे जी मदत शक्य आहे, ती नुकसानग्रस्तांपर्यंत पोहोचविण्याचे काम भाजप करत आहे. मदतीचे सेवाकार्य यापुढेही सुरूच राहील. भाजप म्हणून आम्ही जनतेसोबत आहोत, असा विश्वास भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार नीलेश राणेंनी व्यक्त करत नुकसानग्रस्तांना दिलासा दिला.
तौक्ते चक्रीवादळानंतर नुकसान झालेल्या मालवण, देवबाग, वायरी व अन्य परिसराची राणेंनी सोमवारी पाहणी करून नुकसानग्रस्तांना पत्रे, ताडपत्री व जीवनावश्यक वस्तू आदी मदतीचे वाटप केले. कौलांची गाडीही सायंकाळपर्यंत येईल. नुकसानग्रस्तांना कौलांचेही वितरण केले जाईल, असेही त्यांनी सांगत ग्रामस्थांना दिलासा दिला. देवबागात नुकसानग्रस्त ग्रामस्थांच्या घरी जाऊन पाहणी करून त्यांना दिलासा देताना आम्ही सोबत असल्याचा विश्वास राणेंनी ग्रामस्थांना दिला. वादळ झाल्यापासून भाजपचे मदतकार्य सुरू आहे. जनतेला थेट मदत देण्याचे आमचे प्रयत्न आहेत. केंद्र शासनाकडूनही मदतीसाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस बाबा परब, सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विक्रांत नाईक, भाई मांजरेकर, जॅक्सन फर्नांडिस, अवी सामंत आदी उपस्थित होते. अनेक ठिकाणी वीजपुरवठा अद्याप पूर्ववत झालेला नाही. ज्या ठिकाणी तो झालाय, त्याचे श्रेय स्थानिक जनतेचे. त्यांनी मदत केली म्हणून लाईट आली. तुटलेली झाडे जनतेने तोडली, बाजूला केली. त्यामुळे सत्ताधारी आमदार, खासदार, पालकमंत्री पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. प्रशासनावर अंकुश नसल्याने मालवण अजूनही अंधारात आहे. मात्र, आम्ही सतत प्रशासनाच्या संपर्कात आहोत. वीज साहित्याची कमतरता होती. ती दूर केली. बाहेरून आलेले कर्मचारी परत जात होते. जिल्हाधिकाऱयांना सांगून त्यांना थांबविले. भाजप जनतेला सर्वतोपरी मदत करणार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.
वादळ म्हणजे आमदारांचा सिझन!
वादळ, भूकंप झाला, की आमदार नाईक यांचा सिझन सुरू होतो. त्यांचा पत्र्याचा धंदा आहे. लाज वाटली पाहिजे शिवसेनेच्या आमदाराला. या आपत्तीकाळात पत्रे विकणे सुरू आहे. ज्यावेळी जनतेला मदत पाहिजे, तेव्हा हे व यांचे मंत्री नुसती आश्वासने देत आहेत. मुख्यमंत्री येऊनही जनतेला मदत जाहीर होत नाही ही शोकांतिका आहे, असा प्रहार राणेंनी केला. मुख्यमंत्र्यांशी बोललेल्या क्लिप व्हायरल करायच्या व आपली पाठ थोपटून घ्यायची कामे आमदार नाईक करत असून जनतेशी त्यांचे देणेघेणे नाही, असा टोला राणेंनी लगावला.
‘त्या’ बंद खोलीत काय चर्चा झाली?
सिंधुदुर्ग वादळाच्या सावटाखाली असताना पालकमंत्री उदय सामंत यांनी सिंधुदुर्गला वाऱयावर सोडले. भाजप नेते, राज्याचे विरोधी पक्षनेते रत्नागिरी दौऱयावर असताना पालकमंत्री सामंत त्यांना येऊन गुपचूप भेटतात. बंद दाराआड चर्चा होते. सामंत यांचे सगळे विषय टेंडरचे असतात, असा आरोप राणेंनी केला.









