सुरळीत पाणी पुरवठय़ासाठी मनपा-एल ऍण्ड टी कंपनीकडून प्रयत्न
प्रतिनिधी /बेळगाव
विविध मागण्यांसाठी पाणी पुरवठय़ाच्या कामगारांनी आंदोलन छेडल्याने पाणी पुरवठा नियोजन कोलमडले आहे. काही भागात आठ दिवसापासून पाणी नसल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी एल ऍण्ड टी आणि महापालिकेने प्रयत्न चालविले आहेत. सध्या हंगामी तत्त्वावर काही कामगारांची नियुक्ती करून पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
राकसकोप आणि हिडकल जलाशयामध्ये मुबलक पाणीसाठा असूनही शहरात पाणी समस्या निर्माण झाली आहे. पाणी पुरवठा मंडळाकडे काम करणाऱया हंगामी कामगारांना एल ऍण्ड टी कंपनीकडे हस्तांतर करण्यात आले आहे. पण कित्येक वर्षे हंगामी तत्त्वावर काम करणाऱया कामगारांना सेवेत कायम करण्यात आले नाही. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात आंदोलन छेडून हंगामी कामगारांना सेवेत कायम करावे, अशी मागणी केली होती. महापालिका आयुक्तांच्या आश्वासनानंतर पाणी पुरवठय़ाच्या कामगारांनी आंदोलन मागे घेतले होते.
पण याबाबत शासनाने कोणताच निर्णय घेतला नसल्याने सोमवार दि. 10 पासून काम बंद आंदोलन छेडले आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा पूर्णपणे कोलमडला आहे. शहरातील विविध भागात आठ दिवसापासून पाणीपुरवठा करण्यात आले नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
काही कामगारांना प्रशिक्षण देऊन पाणीपुरवठय़ाची जबाबदारी
मुबलक पाणीसाठा असूनही शहरवासियांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. पाणी समस्या निवारणासाठी महापालिका आणि एल ऍण्ड टी कंपनीच्या अधिकाऱयांनी प्रयत्न चालविले असून सध्या काही कामगारांना प्रशिक्षण देऊन पाणीपुरवठय़ाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
आंदोलन मागे घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले. मात्र महापालिका आयुक्तांच्या प्रयत्नांना यश आले नसल्याने नव्या कामगारांना घेऊन पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न महापालिका व एल ऍण्ड टी कंपनीने चालविला आहे. मात्र नवे कामगार असल्याने सर्वच भागात पाणीपुरवठा करणे अशक्मय आहे. त्यामुळे विविध भागात पाणीसमस्या निर्माण झाली असून पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करण्याची वेळ आली आहे.
तसेच पाणी टँकरने विकत घेण्याची वेळ आली असल्याने आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. सध्या शहर आणि उपनगरात पाणीसमस्या निर्माण झाल्याने कामगारांचे आंदोलन मागे कधी घेणार आणि सुरळीत पाणीपुरवठा कधी होणार, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
जनतेसाठी कामावर रुजू होण्यास तयार : कामगार

पाणीपुरवठा मंडळाच्या कर्मचाऱयांना पाण्यासाठी सर्वसामान्य जनता फोन करत आहे. त्यामुळे या कर्मचाऱयांनी सोमवारी जिल्हाधिकाऱयांची भेट घेऊन आम्ही काम करण्यास तयार आहे. मात्र आम्हाला वेतन वाढवून द्या, तातडीने कामाला सुरुवात करू, अशी ग्वाही पाणीपुरवठा मंडळाच्या कर्मचाऱयांनी दिली. आम्ही जनतेचे त्रास करणार नाही. जनतेसाठी आम्ही कधीही सज्ज आहोत, असे त्यांनी यावेळी सांगितले.
पाणीपुरवठा मंडळाच्या कर्मचाऱयांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन छेडले आहे. त्यामुळे शहरातील अनेक ठिकाणचा पाणीपुरवठा कोलमडला आहे. पाणीपुरवठा बंद असल्यामुळे नागरिक रात्री आम्हाला पाणी सोडा, म्हणून फोन करत आहेत. सर्वसामान्य जनतेचे फोन पाहून आम्हालाही कळवळा येत आहे. कोरोना काळात तुम्ही आंदोलन करू नका, अशी विनवणी अनेक जण करत आहेत. तेंव्हा आम्ही कामावर रुजू होण्यास तयार आहे, असे त्यांनी जिल्हाधिकाऱयांना सांगितले. कूपनलिकांचे पाणी पिऊन सर्दी, पडसे यासारखे आजार होत आहेत. तेंव्हा तातडीने पाणी सोडा, अशी विनवणी केली जात आहे. आता आम्ही काम करण्यास तयार आहे, असे त्यांनी सांगितले. त्यावर जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी मनपा आयुक्तांशी चर्चा करून तुम्हाला निर्णय सांगू, असे त्यांनी स्पष्ट केले. या चर्चेत बाहुबली गुमाजी, परशराम कोकणी, मंजुनाथ दोडवाड, सुब्रम्हण्यम् कांबळे, सदाशिव बेन्नी, श्वेता कांबळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.









