शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांची माहिती
प्रतिनिधी /बेंगळूर
कोविड टास्क फोर्स, बालरोग तज्ञ आणि तांत्रिक समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारे 23 ऑगस्टपासून नववी, दहावी तसेच अकरावी आणि बारावीचे वर्ग सुरू केले जाणार आहेत. याला मिळणारा प्रतिसाद विचारात घेऊन पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग लवकरच सुरू करण्यात येतील, अशी माहिती प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी दिली.
चित्रदुर्ग येथे पत्रकारांशी ते बोलत होते. सध्या पालक आणि मुलांकडून मागणी होत असल्याने काही वर्ग सुरू केले जात आहेत. अलीकडेच यासंबंधीची सुरक्षा मार्गसूची जारी करण्यात आली असून त्याचे सक्तीने पालन करण्याची सूचना देण्यात आली आहे. मुलांचे मन शाळेकडे वळविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन शिक्षकांना करण्यात आले आहे, असेही मंत्री बी. सी. पाटील यांनी सांगितले.
कोणत्याही कारणास्तव मुलांना शाळेत बळजबरीने आणता येणार नाही. मुलांना शाळेत पाठविण्यास पालकांनी संमती दर्शविली नाही तर ऑनलाईनद्वारेच या मुलांचा अभ्यास घ्यावा. त्यामुळे कोणीही विनाकारण भीती बाळगण्याची आवश्यकता नाही. ऑफलाईन वर्गांसाठी विद्यार्थी हजर झाल्यानंतर एखाद्या वेळेस कोणीतरी कोराना पॉझिटिव्ह आढळून आला, तर शाळा आठवडाभर बंद ठेवण्यात येईल. शाळा पूर्णपणे सॅनिटाइझ केल्यानंतर पुन्हा सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या सुरू असलेल्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीला विद्यार्थ्यांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत आहे. 30 ते 40 टक्के विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून दूर असल्याचे एका पाहणीत आढळून आल्याचे मंत्री बी. सी. नागेश यांनी सांगितले.
शिक्षकांना गटशिक्षणाधिकारी कार्यालयात लस
राज्यात 23 ऑगस्टपासून आठवीचा वर्ग वगळता माध्यमिक शाळा आणि पदवीपूर्व महाविद्यालये सुरू होत आहेत. या पार्श्वभूमीवर 23 ऑगस्टपूर्वी राज्यातील सर्व शिक्षकांना कोविड प्रतिबंधक लस देण्याची व्यवस्था गटशिक्षणाधिकारी कार्यालयात करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रतिकार करत जीवनप्रवास सुरू ठेवला पाहिजे. मागील दीड वर्षापासून मुलांचे शिक्षण कसे झाले, याची जाणीव सर्वांना आहे. शिवाय मुले शिक्षणापासून बराच काळ दूर झाल्याचेही सर्वांना ठाऊक आहे. त्यामुळे तज्ञांचा सल्ला घेऊनच नववी, दहावी, अकरावी आणि बारावीचे वर्ग दररोज अर्धा दिवस भरविण्यात येणार आहेत, असे ते म्हणाले.