केंद्र सरकारने यंदाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. त्यात एक व्यक्ती अशी आहे जिला आठव्या इयत्तेतच शाळा सोडावी लागली होती. तथापि, आज ती व्यक्ती शाळा चालवित आहे. ओरिसातील नंदकिशोर पृस्ती यांची ही प्रेरणादायक कहाणी आहे. सध्या त्यांचे वय 102 वर्षे आहे आणि 1946 पासून ते शाळा चालवितात.

शंभरी उलटून गेल्यानंतरही ठणठणीत प्रकृती असणारे नंदकिशोर यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ते दिवसाचा बहुतेक वेळ आपल्या शाळेतील मुलांसमवेतच व्यतित करतात. मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे आणि पायाभूत शिक्षण प्रदान करणे हे त्यांचे जीवनध्येय असून जीवनविषयक शिक्षण हे या शाळेचे वैशिष्टय़ मानले जाते. नंदकिशोर स्वतः शिक्षण पूर्ण करण्याआधीच शाळा सोडलेले विद्यार्थी होते, हे लक्षात घेतले तर त्यांच्या कार्याचे महत्त्व अधिकच पटते. 1946 पासून आतापर्यंत त्यांच्या शाळेतून हजारो विद्यार्थी उत्तम गुणवत्तेचे शिक्षण घेऊन बाहेर पडलेले असून त्यापैकी अनेक जण शिक्षक, सरकारी अधिकारी, अभियंते, डॉक्टर्स झालेले आहेत. शिवाय इतरही क्षेत्रांमध्ये त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी नाव कमावले आहे.
त्यांच्या शाळेला कोणतेही सरकारी अनुदान नाही. लोकसहभागातून ती चालते. अशा या शाळेचा विद्यार्थ्यांना अभिमान नसेल तरच नवल. तीन वर्षे वयाचे विद्यार्थिही त्यांच्या शाळेत आहेत. आपल्या गुरुजींना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे याची त्यांना कल्पनाही नाही. पद्मश्रीचा अर्थ समजण्याइतके त्यांचे वय नाही. मात्र, शाळेबद्दल आणि गुरुजींबद्दल त्यांचा अभिमान कोठेही उणा पडत नाही. पद्मश्री पुरस्कार मिळाल्यामुळे आपल्या कार्याची ओळख साऱया देशाला होईल आणि अधिकाधिक लोक शिक्षण क्षेत्रात उतरण्याची प्रेरणा घेतील, अशी प्रतिक्रिया नंदकिशोर व्यक्त करतात.









