सेन्सेक्समध्ये 935 अंकांची वाढ, बँकिंग समभाग नफ्यात
वृत्तसंस्था/ मुंबई
आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी सोमवारी भारतीय शेअर बाजारात चांगली तेजी दिसून आली. दोन्ही निर्देशांक तेजीसह बंद झाले असून बँकिंग समभाग नफ्यात होते.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 935 अंकांच्या वाढीसह अर्थात 1.68 टक्केसह 56,486.02 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 240 अंकांच्या वाढीसह अर्थात 1.45 टक्केसह 16,871.30 अंकांवर बंद झाला. एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि ऍक्सिस बँक यांचे समभाग 2 ते 3 टक्के वाढलेले दिसले. सोमवारी बँकिंग समभागांनी तेजी राखत बाजाराला उत्तम आधार दिला. पेटीएमचा समभाग मात्र 12 टक्के इतक्या घसरणीसह 680 रुपयांवर बंद झालेला दिसला. हा भाव आजवरचा सर्वात नीचांकी असल्याचे सांगितले जाते. मागच्या आठवडय़ात रिझर्व्ह बँकेने यावर नवे ग्राहक जोडणी करण्यावर निर्बंध लादले होते. बँकिंग क्षेत्राचा निर्देशांकही मजबुतीसह म्हणजेच 765 अंकांच्या वाढीसह 35,312 अंकांवर बंद झाला होता.
तर दुसरीकडे साखर क्षेत्रातील कंपन्यांचे समभागही चांगलीच तेजी दर्शवत होते. बलरामपूर, धामपूरचे समभाग 5 ते 19 टक्के वधारत बंद झाले. साखरेची यंदा चांगली निर्यात होण्याचे संकेत मिळाले असून याला लागून या क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग वधारल्याचे तज्ञ सांगत आहेत.
सोमवारी सकाळी सेन्सेक्स 64 अंकाच्या तेजीसह 55,614 अंकांवर खुला झाला होता. सेन्सेक्सने व्यवहारात 56,545 अंकांचा सर्वोच्च स्तर आणि 55,556 चा नीचांकी स्तर गाठला होता. 30 पैकी 4 समभाग मात्र घसरणीसह बंद झाले तर उर्वरीत 26 तेजीसोबत बंद झाले. यात मारुती सुझुकी व विप्रोचे समभाग 2 टक्के वाढीसह बंद झाले. टायटन, कोटक बँक, लार्सन टुब्रो, महिंद्रा आणि महिंद्रा, आयटीसी, एचसीएल यांचे समभाग तेजीत होते. रिलायन्स, एशियन पेंटस्, बजाज फिनसर्व्ह, एअरटेल, नेस्ले, बजाज फायनान्स, इंडसइंड बँक, पॉवरग्रिड कॉर्प, एनटीपीसी व अल्ट्राटेक यांचे समभाग तेजीसह बंद झाले. निफ्टीतील 50 पैकी 37 कंपन्यांचे समभाग तेजीत होते. लिस्टेड कंपन्यांचे बाजार भांडवल 254.26 लाख कोटी रुपये इतके राहिले होते.
आंतरराष्ट्रीय बाजारांचा विचार करता अमेरिकेतील बाजार नकारात्मक तर युरोपियन बाजार मात्र तेजीचा कल दर्शवत होते. आशियाई बाजारात निक्केई मात्र तेजीत होता, हँगसेंग, कोस्पी व शांघाई कम्पोझीट निर्देशांक घसरणीत होते.








