बाजारात फळांची आवक वाढल्याने दर कमी
प्रतिनिधी/ बेळगाव
शनिवारच्या आठवडी बाजारात फळांचा बाजार बहरला असून कोरोनाच्या काळात आरोग्य उत्तम राखण्यासाठी फळांचे सेवन बुस्टर डोस ठरत आहे. फळांच्या किमती नेहमी अधिक असल्याने सर्वसामान्यांना फळांचे सेवन करणे कठीण असते. मात्र, सध्याच्या परिस्थितीत प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पौष्टिक आहाराची गरज असल्याने जेवणानंतर एक तरी फळ खावे याचा अवलंब केला जात आहे. त्यातच दर कमी झाल्याने फलाहार स्वस्त झाला आहे. बाजारात फळांची आवक वाढली असून दरदेखील कमी झाले आहेत.
लाल भडक सफरचंद, पिवळी धमक मोसंबी, केशरी पपई, डाळींब, संत्री, केळी अशा नानाविध प्रकारच्या फळांनी फळबाजार फुलला आहे. स्वस्तात मस्त अशा फळांची खरेदीही जोरात आहे. सफरचंद 100 रुपये दीड किलो, डाळींब 25 ते 30 रु. किलो, मोसंबी 50 ते 60 रु. किलो, केळी 20 रु. डझन, पपई 20 रु. नग अशा फळांनी बाजार बहरला आहे. आवक वाढल्याने दर कमी झाल्याच्या प्रतिक्रिया विक्रेत्यांमधून व्यक्त होत आहेत.
गणपत गल्ली, नरगुंदकर भावे चौक तसेच मुख्य बाजारपेठेच्या ठिकाणी इतर बाजारापेक्षा फळविक्री जोरदार सुरू आहे. आठवडी बाजारात परगावाहून तसेच ग्रामीण भागातून येणाऱया नागरिकांकडून फळांची खरेदी केली जात असल्याचे दिसून आले.









