फार दिवसांनी आटपाट नगरला जायचा योग आला. त्यांचं एक वैशिष्टय़ आहे. भारतापासून खूप दूर असलं तरी तिथली गावे, शहरे, रस्ते, माणसे, राजकारण, वातावरण वगैरे सर्व गोष्टी आपल्यासारख्याच आहेत. अनेकदा तिथले लोक आपल्या देशातल्या प्रथांची, नवनव्या प्रवाहांची सतत नक्कल करतात. तिथं गेल्यावर परकं मुळीच वाटत नाही. घरातल्यासारखं वाटतं.
..तर मी आटपाट नगरला गेलो. तिथं हिंडताना डेक्कन जिमखान्यावर जायचं होतं. म्हणून बस स्टॉपवर बसची वाट बघत उभा राहिलो. तेव्हा एक फाटक्मया कपडय़ातला माणूस जवळ येऊन उभा राहिला आणि माझ्याकडे टक लावून बघू लागला. भिकारी पाहिला की मला वाईट वाटतं. मी लगेच त्याला देण्यासाठी खिशातून एक नाणं काढलं. त्याला देणार तेवढय़ात तो म्हणाला, “साहेब, मला एक रुपया देण्याऐवजी दहा रुपये द्याल का? फार उपकार होतील.’’
“कशासाठी हवेत दहा रुपये?’’
“मला डेक्कन जिमखान्यावर जायचं आहे. जायला पाच रुपये तिकीट पडेल. यायला पाच रुपये तिकीट पडेल. तिथं एक काम करून घरी परत यायचं आहे.’’
मी त्याला दहाची नोट दिली. त्याने माझे आभार मानले व नमस्कार केला. आम्ही दोघे बसची वाट बघू लागलो. त्याने मला नाव विचारलं. मी भारतातून आलोय म्हटल्यावर तो माझ्याकडे असूयेने बघू लागला. मी त्याला त्याच्याबद्दल विचारलं.
“मी या मतदारसंघातला आमदार आहे, साहेब,’’ तो उत्तरला.
“काय म्हणताय? तुम्ही चक्क आमदार आहात? आणि माझ्याकडे बससाठी दहा रुपये भीक मागताय?’’
“काय करणार साहेब? नशिबाचे भोग आहेत. आम्ही काय प्रगत देशातले आमदार नाहीत. शिवाय आमच्या देशातली पब्लिक लई हलकट आहे हो. दर वेळेला स्थिर सरकार निवडून देतात. त्यामुळे आमच्याकडे अविश्वास ठराव, सरकार पाडणे, आमदारांची खरेदी विक्री कधीच होत नाही. इतर देशातले आमदारांच्या खरेदीचे कोटी कोटी रुपयांचे आकडे आम्ही फक्त वाचतो आणि नशिबाला दोष देऊन गप्प बसतो. आमचं सरकार आणि जनता फार बेक्कार आहेत हो. आमदाराला कोणी फुकट सायकल देखील देणार नाहीत.’’
त्याने डोळे पुसले. माझंही ह्रदय भरून आलं. मी खिशातून पाच रुपयांचं नाणं काढून त्याला देत म्हणालो, “एक कटिंग चहा घ्या माझ्यातर्फे’’.








