बेळगाव / प्रतिनिधी
आझाद गल्ली येथे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यानंतर या परिसरात आशा कार्यकर्त्या व डॉक्टरांनी आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी मेणशी गल्ली, पांगुळ गल्ली, भोई गल्ली, भेंडी बाजार, कामत गल्ली, दर्गा परिसर तसेच इतर भागात आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.
या परिसरातील प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांच्या माहितीसह कुटुंब सदस्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी शिक्षिका, आरोग्य विभागाचे डॉक्टर व इतर अधिकारी ही तपासणी करत आहेत. होम क्वारंटाईन असलेल्या व्यक्तींची दररोज तपासणी करण्यात येत आहे.
कोरोनाग्रस्त महिला आढळल्यानंतर या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभागाला तातडीने या परिसरात जाऊन तपासणी करण्याचे आदेश दिले होते. या परिसराला निर्बंधित प्रदेश म्हणून जाहीर करण्यात आले आहे. त्यानंतर सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. आता आरोग्य तपासणी करून संशयितांना होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येणार आहे.









