बैठकीत अधिकाऱयांशी चर्चा : सरकारी योजना-कायद्यांविषयी उद्यापासून कार्यक्रमांचे आयोजन
प्रतिनिधी / बेळगाव
आझादी का अमृत महोत्सव यानिमित्त सरकारी योजना, कायद्यांविषयी जागृती करण्यासाठी दि. 2 ऑक्टोबरपासून कार्यक्रम हाती घेतले आहेत. कायदा सेवा प्राधिकरण व विविध खात्यांच्या सहयोगातून पॅन इंडिया जागृती कार्यक्रम हाती घेण्यात आल्याचे जिल्हा मुख्यसत्र न्यायाधीश सी. एम. जोशी यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पॅन इंडिया जागृती कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीच्या अध्यक्षपदावरून बोलताना त्यांनी ही माहिती दिली. 2 ऑक्टोबरपासून 14 नोव्हेंबरपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे. या कार्यक्रमांतर्गत सरकारी योजनांविषयी माहिती देण्याबरोबरच कायद्यासंबंधीही जागृती करण्याचा उद्देश आहे. 2 ऑक्टोबर रोजी न्यायालय आवारात महात्मा गांधी प्रतिमेला पुष्पार्चन करून कार्यक्रमाला चालना देण्यात येणार आहे.
तालुका पातळीवर कार्यक्रमाचे आयोजन करताना न्यायालयीन कामकाजाची वेळ लक्षात घेऊन आयोजित केल्यास न्यायाधीशांनाही भाग घेता येणार आहे. विविध खात्यांविषयी माहिती असणारी पत्रके तयार करून त्याचे वाटप केल्यास नागरिकांना माहिती मिळणार आहे. 2 ऑक्टोबर रोजी शाळकरी मुलांच्या प्रभातफेरीचे आयोजन करावे, या कार्यक्रमात न्यायाधीश, त्यांचे कुटुंबीय व वकीलही भाग घेणार आहेत, असे जिल्हासत्र न्यायाधीशांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, जिल्हा कायदा सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव देवराज अर्स, अप्परजिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, पोलीस उपायुक्त स्नेहा, बसवराज वरवंटी, आरसीयूचे कुलसचिव प्रा. बसवराज पद्मशाली आदींसह अधिकारी उपस्थित होते.









