प्रथमच बंदोबस्ताशिवाय होतेय विसर्जन
प्रतिनिधी/ बेळगाव
मंगळवारी श्री विसर्जन होणार आहे. यासाठी गणेशोत्सव मंडळांनी तयारी केली आहे. प्रथमच कडक पोलीस बंदोबस्ताशिवाय विसर्जन होत असून यंदा मिरवणूक नसणार आहे. मंगळवारी सकाळी 8 वाजता हुतात्मा चौक येथे मानाच्या श्रीमूर्तीचे पूजन करुन विसर्जनाला सुरुवात करण्यात येणार आहे.
बेळगावचा गणेशोत्सव म्हणजे दरवषी तीन ते चार हजार पोलीस बळ इतर जिह्यातून मागविण्यात येत होता. सायंकाळी मिरवणूक सुरु झाली की दुसऱया दिवशी सकाळपर्यंत 18 ते 20 तासांपर्यंत श्री विसर्जन व्हायचे. पोलीस अधिकाऱयांवर बंदोबस्ताची मोठी जबाबदारी असायची.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमिवर यंदा मिरवणूक रद्द करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी तीनही महामंडळांच्या पदाधिकाऱयांची बैठक घेऊन पोलीस अधिकाऱयांनी त्यांना सूचना केल्या आहेत. एसीपी व पोलीस निरीक्षकांवर जबाबदारी सोपविण्यात आली असून मिरवणुकीशिवाय जवळच्या मार्गाने जाऊन श्री विसर्जन करण्याच्या सूचना अधिकाऱयांनी केल्या आहेत.
मिरवणूक, रोषणाई, डॉल्बी, पारंपरिक वाद्य आदींना फाटा देवून कोरोनाच्या पार्श्वभूमिवर केवळ पाच पदाधिकाऱयांनी श्रीमूर्तीसह विसर्जनाच्या ठिकाणी येण्याचा सल्ला पोलीस अधिकाऱयांनी दिला आहे. अनेक मंडळांनी दीड, पाच, सात व नवव्या दिवशी श्रींचे विसर्जन केले आहे. मंगळवारी सकाळी 6 ते सायंकाळी 5 च्या आत विसर्जन करण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱयांनी केल्या आहेत.
मद्यविक्री बंदीचा आदेश जारी
श्री विसर्जनाच्या पार्श्वभूमिवर पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी बेळगाव शहर व तालुक्मयात मद्यविक्री बंदीचा आदेश जारी केला आहे. मंगळवारी 1 सप्टेंबरच्या सकाळी 6 पासुन बुधवारी 2 सप्टेंबरच्या सकाळी 6 पर्यंत दारु दुकाने, वाईन शॉप, बार, क्लब, हॉटेलमध्ये मद्य विक्री बंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. याआदेशाचे उल्लंघन करणाऱयांवर कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर व्यापक खबरदारी घेत यंदाच्या गणेशोत्सवासाठी राज्य सरकारने परवानगी दिली होती. सुरुवातीला मंडप उभारण्यासाठीही परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र मूर्ती प्रति÷ापनेसाठी ज्या गल्ल्यांत मंदिरे नाहीत अशा मंडळांनी छोटेशे मंडप उभारण्यास परवानगी देण्यात आली होती.
यासंबंधी पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांच्याशी संपर्क साधला असता बेळगावच्या गणेशोत्सवाबद्दल आपण खूप ऐकलो होतो. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमिवर यंदा मिरवणुकीशिवाय श्री विसर्जन होणार आहे. कोरोना महामारी थोपविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.









