प्रतिनिधी/ पणजी
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उपान्त्य फेरी समजल्या जाणाऱया आणि विद्यमान डॉ. प्रमोद सावंत सरकारची कसोटी म्हणून ओळखल्या जाणाऱया राज्यातील जिल्हा पंचायत निवडणुकीचे मतदान आज शनिवार 12 रोजी सकाळी 8 ते सायं. 5 या दरम्यान मतदान होत आहे. दोन्ही जिल्हा पंचायतींतील 50 पैकी 48 जागांवर हे मतदान होणार एकूण 7 लाख 91 हजार 814 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. कोरोना संक्रमितांची संख्या नियंत्रणात असली तरी धोका पूर्णतः टळलेला नाही. त्यामुळे कोरोनाच्या गडद छायेतच ही निवडणूक होत आहे. गोवा राज्य निवडणूक आयोगाने सर्व तयारी पूर्ण केली असून कर्मचारी व अधिकाऱयांनी मतदान केंद्रांचा ताबा घेतला आहे. एकूण 1187 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.
सत्ताधारी भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काँग्रेस, मगो या दोन विरोधी पक्षांसह आप व अपक्षांनी देखील सरकारसमोर आव्हान उभे केले आहे. 200 उमेदवारांचे भवितव्य आज सायंकाळी सीलबंद होणार आहे.
आजच्या मतदानातून जनमत होणार स्पष्ट
वर्ष 2022 च्या प्रारंभी होणाऱया राज्य विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी राज्यातील एकूण मतदारांपैकी दोन तृतीयांश मतदारांकडून जनमताचा फैसला होणार आहे. उत्तर गोव्यात 25 तर दक्षिण गोव्यात 23 मतदारसंघांत निवडणूक होणार आहे. दक्षिणेतील सांकवाळ मतदारसंघाचा उमेदवार बिनविरोध विजयी झाला आहे तर नावेलीतील उमेदवाराचे निधन झाले आहे. त्यामुळे दोन्ही मतदारसंघात निवडणूक होणार नाही.
तब्बल पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक जागा राखीव
दोन्ही जिल्हा पंचायतींमधील मिळून एकूण 50 पैकी 30 मतदारसंघ राखीव असून त्यातील महिलांसाठी उत्तरेत 5 व दक्षिणेत 4, ओबीसीसाठी प्रत्येकी 5, महिला ओबीसीसाठी प्रत्येकी 3, अनुसूचित जातीसाठी उत्तर गोव्यात 1 आणि अनुसूचित जमातीसाठी उत्तर गोव्यात 1 व दक्षिणेत 3 अशा जागांचा समावेश आहे. अनुसूचित जमातींच्या महिलांसाठी 2 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
राज्यात एकूण 1187 मतदानकेंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. उत्तर गोव्यात 641 तर दक्षिण गोव्यात 546 केंद्रे आहेत. उत्तर गोव्यात 6 तर दक्षिण गोव्यात 4 मतदानकेंद्रे संवेदनशील जाहीर करण्यात आली आहेत.
महिला उमेदवार ठरविणार उमेदवारांचे भवितव्य?
आज सायंकाळी 200 उमेदवारांचे भवितव्य सीलबंद होईल. दि. 14 रोजी जनतेचा फैसला जाहीर केला जाईल. एकूण 7 लाख 91 हजार 814 मतदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत. त्यात 3 लाख 85 हजार 222 पुरूष व 4 लाख 6 हजार 592 महिला मतदार आहेत. पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांचीच संख्या जास्त आहे. उत्तर गोव्यात 4 लाख 18 हजार 921 मतदार आहेत. त्यात 2 लाख 4 हजार 571 पुरूष व 2 लाख 14 हजार 350 महिला मतदार आहेत. दक्षिण गोव्यात 1 लाख 80 हजार 651 पुरूष तर 1 लाख 92 हजार 224 महिला मतदार आपल्या मतदानाचा हक्क आज बजावणार आहेत.
उत्तर गोव्यातील 25 मतदारसंघातून 104 उमेदवार तर दक्षिण गोव्यातील 23 मतदारसंघांतून 96 उमेदवार भवितव्य आजमावत आहेत. जिल्हा पंचायतीचे हे मतदान मतपत्रिकेद्वारे होणार आहे.
भाजप 41, काँग्रेस 37, मगो 17, आप 20 जागा
या निवडणुकीत राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीचे सर्वाधिक 41 उमेदवार रिंगणात आहेत. त्यात उत्तर गोव्यात 25 आणि दक्षिण गोव्यातील 16 मतदारसंघांचा समावेश आहे. काँग्रेसच्या 37 पैकी उत्तरेत 21 तर दक्षिणेत 16 उमेदवार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर गोव्यात 3 व दक्षिण गोव्यात 3 जागा लढवित आहे. मगो व भाजप हे समविचारी पक्ष आहेत व एकमेकांविरोधात निवडणूक लढवत आहेत. मगोने उत्तरेत 7 व दक्षिण गोव्यात 10 मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत. भाजपच्या निकालात फरक करण्याचे सामर्थ्य या पक्षात आहे. आप पक्षाने 20 मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत. उत्तरेत 7 तर दक्षिणेत 13 उमेदवार निवडणूक लढवित आहेत.
अपक्ष उमेदवार चित्र बदलणार
राज्यातील सर्व मतदारसंघात अपक्ष उभे असून उत्तर गोव्यात 40 तर दक्षिण गोव्यात 38 ठिकाणी ते उभे आहेत. राजकीय चित्र बदलण्यात मोठी भूमिका हे उमेदवार बजावणार आहेत.
निवडणूक चुरशीची, मतदान किती होणार?
जिल्हा पंचायतीची ही निवडणूक चुरशीची होईल. या निवडणुकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची सत्वपरीक्षा लागणार आहे. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे किती मतदार हे बिनधास्तपणे मतदान केंद्रावर येतात यावर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे. कमी मतदानाचा लाभ हा सत्ताधारी भाजपला होऊ शकतो. जास्त मतदान झाले तर निवडणुकीत काहीही होऊ शकते. सत्ताधारी भाजप मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या नेतृत्वाखाली तयारीनिशी व योजनाबद्दरित्या निवडणूक रिंगणात उतरलेला आहे. कार्यकर्त्यांची फौज या पक्षाकडे आहे. या उलट विरोधी पक्षाने फार मोठी तयारी केलेली नाही. तरी देखील मतदारसंघात निवडणूक अटीतटीची होईल.
14 रोजी मतमोजणी
जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी सोमवार दि. 14 डिसेंबर रोजी हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी एकूण 15 केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. त्यात उत्तर गोव्यात 6 तर दक्षिण गोव्यात 9 केंद्रांवर मतमोजणी होईल. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होऊन ती सायंकाळी उशिरा संपुष्टात येईल.









