क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
सातव्या हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत आज मंगळवारी वास्कोतील टिळक मैदानावर गतवर्षीय उपविजेता चेन्नईन एफसी आणि जमशेदपूर एफसी यांच्यात सामना होत आहे. भारतीय फुटबॉलमध्ये चाहते ज्यांना प्रोत्साहन देतात ते प्रशिक्षक आणि फुटबॉलपटू काही काळानंतर वेगळय़ा क्लबची जर्सी परिधान करतात. या आजच्या लढतीतही हेच घडणार आहे. चेन्नईनच्या समर्थकांना आपले तीन सदस्य प्रतिस्पर्धी संघाकडे दिसतील.
गेल्या मोसमात ओवेन कॉयल यांच्या मार्गदर्शनाखाली चेन्नईन एफसीने गुणतक्त्यात तळातून मुसंडी मारताना जवळपास आयएसएल जेतेपदापर्यंत संधी निर्माण केली होती. त्यानंतर मोसमाअखेर ओवेन कॉयल यांनी जमशेदपूर एफसीशी करार केला. त्यांनी आपल्या बरोबर गतमोसमात सर्वाधिक गोल करणाऱया खेळाडूंच्या क्रमवारीत संयुक्तपणे अव्वल स्थान मिळविलेल्या नेरीयूस वॅल्सकीस याला नेले. याशिवाय बचावफळीतील लाल्डीनलियाना रेंथलई हा मिझोरामाचा फुटबॉलपटू चेन्नईनकडे दोन मोसमांच्या खंडानंतर परतला.
जे फुटबॉलपटू चेन्नईनमध्ये उरले आहेत, त्यांच्याविषयी कॉयल यांना चांगलीच कल्पना आहे. पण स्कॉटलंडचे कॉयल ही फायदय़ाची बाब मानत नाहीत. जेव्हा तुम्ही जुन्या संघाविरूद्ध खेळता, तेव्हा ते खेळाडू त्यांची क्षमता प्रदर्शित करण्यास उत्सुक असतात. तुम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवला ते खेळाडू असल्याचे त्यांना दाखवून दय़ायचे असते. त्यामुळे आम्ही त्यांच्या क्षमतेचा आदर करू, असे कॉयल म्हणाले.
नेरीयूसला करारबद्ध केल्यामुळे जमशेदपूरच्या आक्रमणाची भेदकता नक्कीच वाढली आहे. पण इतर काही क्षेत्रात सुधारणा करावी लागणार यांची कॉयल यांना जाणीव आहे. गेल्या मोसमात जमशेदपूर एफसी विरूद्ध 35 गोल झाले, जे फक्त हैदराबाद एफसीपेक्षा कमी होते. अशावेळी संडरलँडचा बचावपटू स्टीफन इझे यांना पाचारण केल्यामुळे जमशेपूरचा बचाव भक्कम होतो का हे पाहावे लागेल.
चेन्नईन एफसीसमोर निरोप घेतलेल्या खेळाडूंची उणीव भरून काढण्याचे आव्हान आहे. परदेशी खेळाडूंमध्ये केवळ नवा कर्णधार रॅफेल क्रिव्हेलारो आणि बचावपटू एली सॅबिया हेच कायम आहेत. नवे प्रशिक्षक साबा लॅसझ्लो यांना नव्या खेळाडूंकडून आशा असतील. स्लोव्हाकियाचा स्ट्रायकर जेकुब सिल्व्हेस्ट्रे आणि बोस्नियाचा बचावपटू इनेस सिपोविच यांच्यावर जास्त मदार असेल. जमशेदपूरच्या चाहत्यांनाही चेन्नईनकडे एक परिचित चेहरा दिसेल आणि तो असेल ब्राझिलचा बचावपटू मेमो याचा, जो गेल्या मोसमात त्यांच्याकडे होता.
संघात इतकी भर पडली असली, तरी एक परिचित चेहरा बरेच दडपण पेलत असेल आणि तो असेल क्रिव्हेलारोचा. त्याने गेल्या मोसमात लीगमध्ये गोल करण्याच्या सर्वाधिक 52 संधी निर्माण केल्या होत्या.
कर्णधार बनल्याने मला फार आनंद झाल्याचे क्रिव्हेलारो म्हणाला. हा एक मोठा सन्मान आहे. माझी खेळण्याची शैली तशीच असेल आणि सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे, माझ्या स्ट्रायकर्ससाठी चांगल्या चाली रचाव्या लागतील, असे तो शेवटी म्हणाला.