केंद्रांवर कडेकोट सुरक्षा : दुपारी 12 पर्यंत कल स्पष्ट होणार
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतगणना आज (गुरुवारी) केली जाणार आहे. या सर्व राज्यांमधील मतगणना केंद्रांवर सकाळी 8 वाजता या प्रक्रियेला प्रारंभ होणार असून दुपारी 12 वाजेपर्यंत कल स्पष्ट होऊ शकतील.
या सर्व राज्यांमध्ये मिळून विधानसभेच्या 690 जागा आहेत. त्यापैकी उत्तरप्रदेशात 403, उत्तराखंडमध्ये 70, पंजाबमध्ये 117, मणिपूरमध्ये 60 तर गोव्यात 40 जागा अशी विभागणी आहे. सर्व मतगणना केंद्रांवर सज्जता पूर्ण करण्यात आली असून कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येत आहे. अतिरिक्त केंद्रीय सुरक्षा दलेही सज्ज आहेत. उत्तरप्रदेशात मतगणना रात्री उशिरापर्यंत चालू शकते.
तीव्र चुरस
या सर्व राज्यांमधील विविध राजकीय पक्षांमध्ये विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी तीव्र स्पर्धा आहे. त्यामुळे सर्व पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात आला होता. उत्तरप्रदेश हे भारतातील सर्वात मोठे राज्य असल्याने तेथे काय घडते, याकडे विशेष औत्सुक्याने पाहिले जात आहे. या निवडणुकांचे परिणाम देशाच्या राजकारणाची दिशा बदलू शकतात, असे काही तज्ञांचे मत आहे.
सर्वांसाठीच महत्त्वाच्या निवडणुका
केंद्रात आणि उत्तरप्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर येथे सध्या भाजपचे सरकार आहे. तर पंजाबमध्ये काँगेसची सत्ता आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांसमोर आपापली राज्ये टिकविण्याचे आव्हान आहे. या सर्व राज्यांमधील विरोधी पक्ष सत्ताधाऱयांकडून सत्ता हिसकाविण्यासाठी उत्सुक आहेत. मतदारांनी त्यांना कसा प्रतिसाद दिला आहे, हे आज (गुरुवारी) स्पष्ट होणार आहे.
मतदानयंत्रांवर शंका
उत्तरप्रदेशात सपने आतापासूनच इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर शंका घेण्यास प्रारंभ केला आहे. सर्व मतदान यंत्रांवर लक्ष ठेवण्यासाठी सपचे कार्यकर्ते यंत्रे ठेवलेल्या कार्यालयांवर लक्ष ठेवत आहेत. विरोधकांनी तक्रारी केल्याने वाराणसीचे निवडणूक अधिकारी आणि जिल्हा आयुक्तांना मतगणना प्रक्रियेपासून हटविण्यात आले आहे. त्यांच्याजागी नव्या अधिकाऱयांची नेमणूक करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी निवडणूक उपअधिकारी नलिनिकांत सिंग यांनाही हटविण्यात आले होते.
50 हजार अधिकाऱयांची नियुक्ती
मतगणना सुरळीत व्हावी, यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांमध्ये मिळून 50 हजारांहून अधिक अधिकाऱयांची नियुक्ती केली आहे. साधारणतः 1200 केंद्रांवर ही मतगणना होणार आहे, अशी माहिती देण्यात आली. उत्तरप्रदेशात 750 हून अधिक मतगणना केंद्रे सज्ज आहेत. पंजाबमध्ये 200 केंद्रे असून पाचही राज्यांसाठी एकंदर 650 निरीक्षकांची नियुक्ती झाली आहे. कोरोना नियमावलीचे कठोर पालन केले जाणार आहे. सर्व मतगणना केंद्रे आधीच निर्जंतुक केली जातील. सामाजिक अंतर राखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात आली आहेत. मतगणना केंद्रांमध्ये केवळ पूर्ण लसीकरण झालेल्यांना आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसणाऱयांनाच प्रवेश दिला जाणार आहे. एका मतगणना केंद्रात 7 पेक्षा अधिक टेबले ठेवली जाणार नाहीत.









