-बंदमध्ये सहभागी होण्याचे महाविकास आघाडीचे आवाहन
-काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेकडून शहरात मोटरसायकल रॅली
प्रतिनिधी/कोल्हापूर
उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील घटनेत आंदोलनकर्त्या शेतकऱयांची हत्या करण्यात आली. याच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारने 11 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी रात्री 12 वाजल्यापासून बंद सुरु झाला असून सोमवारी सायंकाळी 5 वाजता सांगता होणार आहे. त्यानुसार व्यापारी, उद्योजक, व्यवसायिकांसह नागरीकांनी आपले सर्व व्यवहार बंद ठेवून जिह्यात हा बंद शंभर टक्के यशस्वी करावा, असे आवाहन महाविकास आघाडीच्यावतीने केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत.
शिवसेनेच्यावतीने दुचाकी रॅली व रास्ता रोको
महाविकास आघाडीच्यावतीने पुकारण्यात आलेला कोल्हापूर बंद यशस्वी करण्यासाठी शिवसेना शहर कार्यकारणीच्यावतीने शहरात 500 दुचाकींची भव्य दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शहर कार्यालय, शनिवार पेठ, येथून सकाळी 10 वाजता या दुचाकी रॅलीस प्रारंभ होणार आहे. बंद मागील शेतकरी हत्याकांडाचा निषेध, शेतकरी विरोधी कायदा, शेतकरी बांधवांना पाठींबा आदी माहिती सर्वांना व्हावी, या हेतूने या दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या दुचाकी रॅलीतून शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक आवाहन करणार आहेत. या बंदच्या पार्श्वभूमीवर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडून तावडे हॉटेल नजीक राष्ट्रीय महामार्ग रोखला जाणार आहे.
अंबाबाईचे दर्शन राहणार सुरु
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाईच्या दर्शनासाठी ज्या भाविकांनी ऑनलाईन दर्शनाचा पास काढला आहे, त्यांना कोल्हापूरात येण्यासाठी रोखले जाणार नाही, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
राष्ट्रवादीच्यावतीने बिंदू चौकात करणार आवाहन
कोल्हापूर शहरातील सर्व, व्यापारी, व्यावसायिकांनी बंदमध्ये सहभागी होण्याबाबत राष्ट्रवादीच्यावतीने सोमवारी सकाळी 8 वाजता बिंदू चौकातून आवाहन केले जाणार आहे. यामध्ये शहर व जिल्हा राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
किसान सभेचा महाराष्ट्र बंदला सक्रिय पाठिंबा
अखिल भारतीय किसान सभेच्या महाराष्ट्र राज्य कौन्सिलने या बंदला सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे. किसान सभेच्या सर्व शाखा महाराष्ट्र बंदमध्ये अत्यंत सक्रियपणाने सहभागी होत आहेत. किसान सभेचे काम असलेल्या 21 जिह्यांमध्ये गाव, शहर, तालुका व जिह्यामध्ये ‘बंद’ यशस्वी करण्यासाठी सर्व समविचारी पक्ष व संघटनांच्या तातडीने बैठका घेऊन बंदचे नियोजन करण्याचे आवाहन किसान सभेने आपल्या शाखांना केले आहे.
शाळा बंद ठेवून पाठींबा
जिल्हÎातील सर्व शाळा बंद ठेवून महाराष्ट्र बंदला पाठिंबा देण्याचा निर्णय जिल्हा शैक्षणिक व्यासपीठच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे सोमवारी सर्व शाळा बंद राहणार आहेत.
राष्ट्रीय महामार्ग राहणार बंद
अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापार, उद्योगांसह राष्ट्रीय महामार्गही बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे लोकांनी या कालावधीत घराबाहेर पडू नये, असे आवाहन महाविकास आघाडीच्यावतीने केले आहे.
बंदबाबत व्यापाऱयांमध्ये संभ्रम
कोरोना महामारीतील लॉकडाऊनमुळे अगोदरच व्यापाऱयांचे मोठे अर्थिक नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत ऐन सणातच महाराष्ट्र बंद पुकारल्याने, स्थानिक व्यापाऱयामध्ये संभ्रम निर्माण झाला असून काही व्यापारी संघटनांनी दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र बंदबाबत रस्त्यावरील विक्रेते, किरकोळ व्यापारी यांचा विरोध आहे. कोरोनामुळे गेले 11 महीने छोटया व्यापाऱयांचा व्यवसाय बंद होता. यावेळी शासनाकडून कोणतीच आर्थिक मदत मिळाली नाही. ` शेतकरी हत्या उतर प्रदेशमध्ये तर बंद महाराष्ट्रात का ? अशा संतप्त भावना व्यक्त होत आहे. शहरातील वातावरण बघूनच दुकाने उघडणार आहे. असे शहरातील प्रमुख व्यापारी पेठेतील व्यापाऱयांनी सांगितले.
गुजरीत होणार अर्धशटर डाऊन, गारमेंट राहणार सुरु
बंदबाबत गुजरी येथील सराफ दुकाने अर्ध शटर उघडी राहणार असल्याचे कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी सांगितले. कोरोनामुळे गारमेंट व्यवसाय बंद होता. सद्या दसरा-दिवाळी असल्याने शहरातील राजारामपुरी, महाव्दार रोडसह शहरातील गारमेंट दुकाने सुरू ठेवणार असल्याचे गारममेंट असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकर पोळ यांनी सांगितले. व्यापाऱयांची शिखर संघटना असलेल्या कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स ऍन्ड इंडस्ट्रिजच्या पदाधिकाऱयांशी संपर्क साधला असता, कांही पदाधिकारी बाहेरगांवी असल्याचे, तर कांहीनी संपर्क साधणे टाळले.