करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या संरक्षणात असणाऱया वज्र वाहनाचे स्टेअरींग चार महिलांच्या हाती
प्रतिनिधी / कोल्हापूर
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱया वज्र वाहनाचे स्टेअरींग 4 महिला पोलीस कर्मचाऱयांच्या हाती आहे. मोटर वाहन विभागातील पोलीस हेड कॉन्स्टेबल सुलभा कांबळे, पोलीस नाईक सुजाता शिंदे, पोलीस हवालदार तेजश्री काटकर, पोलीस कॉन्स्टेबल प्रमिला गावीत या चार कर्मचारी ही जबाबदारी सक्षमपणे सांभाळत आहेत.
पुरुषांच्या बरोबरीने महिला सर्वच क्षेत्रांत भरारी घेत आहेत. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या सुरक्षेची जबाबदारीही महिला सक्षमपणे पार पाडत आहेत. कोल्हापूर पोलीस दलातील मोटर परिवहन विभागामध्येही महिला पोलीस कर्मचारी पुढाकार घेत आहेत. सध्या 4 महिला मोटर परिवहन विभागामध्ये रुजू आहेत.
यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल सुलभा कांबळे या गेल्या 13 वर्षापासून वाहन चालवित आहेत. कोणत्याही प्रकारचे वाहन चालविण्यामध्ये त्या पारंगत आहेत. व्हिआयपी दौऱयातील एस्कॉर्ट वाहन, अवजड वाहने चालवण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. पोलीस नाईक सुजाता शिंदे, पोलीस हवालदार तेजश्री काटकर, पोलीस कॉन्स्टेबल प्रमिला सावंत या गेल्या वर्षभरापासून मोटर परिवहन विभागामध्ये कार्यरत झाल्या आहेत. या तीघींनाही वाहन चालविण्याची आवड आहे. वाहन चालविण्यामध्ये त्या पारंगत आहेत. सध्या त्या लाईट मोटर व्हेईकल चालवित आहेत. यामध्ये सुमो, जिप्सी तसेच 112 वरील सर्व प्रकारची वाहने चालवत आहेत. सध्या या तिघीही अवजड वाहने चालविण्याचे प्रशिक्षण घेत आहेत. लवकरच या तिघीही अवजड वाहने चालविण्याचे प्रशिक्षणही पुर्ण करतील.
वज्र म्हणजे काय ?
कोल्हापूर पोलीस दलातही महिला अधिकाऱ्यांचा दबदबा
अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, गृह पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील, पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध श्रद्धा आंबले, यांच्यासह शहरासह जिह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये महिला पोलीस अधीकारी, कर्मचाऱयांचा दबदबा आहे. महत्वाचे तपास, शहर वाहतूक शाखा, गृह विभाग, अनैतिक मानवी वाहतूक, कंट्रोल रुम, अशा विविध विभागातील जबाबदाऱया महिला अधिकारी सक्षमपणे पार पाडत आहेत.
संचलनामध्येही सहभागाची तयारी
पोलीस हेड कॉन्स्टेबल सुलभा कांबळे, पोलीस नाईक सुजाता शिंदे, पोलीस हवालदार तेजश्री काटकर, पोलीस कॉन्स्टेबल प्रमिला गावीत या चार कर्मचाऱयांना प्रजासत्ताक दिन संचलन कार्यक्रमामध्ये वाहन चालविण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचलन होवू शकले नाही.









