क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
सातव्या हिरो इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धेत आज बुधवारी एफसी गोवाची लढत ओडिशा एफसीविरुद्ध होणार आहे. फातोर्डा येथील नेहरु स्टेडियमवर हा सामना खेळविण्यात येईल.
स्पर्धेचा निम्मा टप्प झाला तेव्हा बाद फेरीच दावेदार म्हणून एफसी गोवा संघाला बहुतेकांची पसंती होती, पण सहा लढती बरोबरीत सुटल्याने बाद फेरीतील स्थान गोव्याने कसेबसे टिकवून ठेवले आहे. एफसी गोवाचा संघ आता चौथ्या स्थानावर आहे. पाचव्या स्थानावरील हैदराबाद एफसीप्रमाणेच त्यांचे 24 गुण आहेत. सरस गोलफरक आणि जास्त गोल त्यांच्या जमेची बाजू आहे. सहाव्या स्थानावरील बेंगलोर एफसीपेक्षा ते दोनच गुणांनी पुढे आहे.
आज ओडिशाविरूद्ध बरोबरीची मालिका खंडित करण्याचाच त्यांचा प्रयत्न असेल. त्यांचे तीन सामने बाकी असून यात तळातील ओदिशाविरूद्ध तीन गुण कमावण्याची सर्वोत्तम संधी असल्याचे प्रशिक्षक जुआन फॅरांडो यांना कल्पना आहे. एफसी गोव्यासमोर अनंक खेळाडूंच्या गैरहजेरीचाही प्रश्न असेल. काही खेळाडूंना दुखापती झाल्या आहेत, पण मी चिंता करत नाही, कारण आमच्याकडे चांगला संघ आहे. आम्हाला तयारीसाठी केवळ दोनच दिवस मिळाले असून हीच समस्या असल्याचे जुआन फॅरांडो म्हणाले.
पिछाडीवरून बरोबरी साधत एक गुण कमावण्याची काहीशी सवयच एफसी गोव्याला जडली असावी. चेन्नईन एफसीविरूद्ध त्यांनी अखेरच्या क्षणी हेच केले. पहिला गोल पत्करावा लागल्यानंतर त्यांच्याइतके गुण इतर कोणत्याही संघाला मिळविता आलेले नाहीत. फॅरांडो यांना मात्र आपला संघ पिछाडीवर पडल्यानंतर का जागा होतो याचे कोडे पडले आहे. या घडीला कसून प्रयत्न सुरू ठेवण्याचा आमचा दृष्टिकोन असल्याचे फॅरांडो म्हणाले. स्वरूपात जास्त बदल करणे शक्य नाही. यापुढे या बरोबरींचे विजयांमध्ये रूपांतर होईल अशी आशा आहे, असे ते म्हणाले. दुसरीकडे ओडिशा एफसीला पाठोपाठ पराभव स्वीकारावे लागत आहेत. या मोसमातील काही प्रकारची आकडेवारी त्यांच्यासाठी निराशाजनक आहे. त्यांनी 10 सामने गमविले आहेत. त्यांना एकदाच क्लीन शीट राखता आली असून हे सर्वाधिक कमी प्रमाण आहे. त्यांना एकमेव विजय मिळून आता आठ सामने झाले आहेत तसेच मागील तीन सामन्यांत त्यांना नऊ गोल पत्करावे लागले आहेत.