प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना थोपविण्यासाठी बेळगावसह 11 जिल्हय़ांमध्ये आणखी एक आठवडा लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. तर शनिवार दि. 12 व रविवार दि. 13 जून रोजी विकेंड लॉकडाऊन असणार आहे. लॉकडाऊन वाढीसंबंधी शुक्रवारी रात्री जिल्हादंडाधिकाऱयांनी आदेश जारी केला आहे.
विकेंड लॉकडाऊनच्या काळात केवळ दूध, औषधे, दवाखाने आदी अत्यावश्यक सेवा सुरू असणार आहेत. किराणा मालांसह इतर दुकाने बंद असणार आहेत. बेळगाव शहर व जिल्हय़ात रुग्णसंख्येत घट होत चालली आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. त्यामुळे रुग्णसंख्या आणखी घटविण्यास मदत होणार आहे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
पालकमंत्री गोविंद कारजोळ यांच्या मागणीनुसार बेळगावसह 11 जिल्हय़ांमध्ये 21 जूनच्या सकाळी 6 पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. याआधी घोषणा केल्याप्रमाणे सोमवार दि. 14 जूनच्या सकाळी 6 वाजता लॉकडाऊन शिथिल करायला हवे होते.
गुरुवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढविण्यास विरोध केला होता. लॉकडाऊनमध्ये वाढ केल्यास आर्थिक परिस्थितीला आणखी मोठा फटका बसणार आहे. गरीब, मध्यमवर्गीय, कामगार यांचाही विचार करावा लागणार आहे. त्यामुळे आहे त्या लॉकडाऊनच्या काळात कडक उपाय योजना राबवा, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला केली होती. आता जिल्हाधिकाऱयांनी काढलेल्या नव्या आदेशानुसार 21 जूनच्या सकाळी 6 पर्यंत लॉकडाऊन असणार आहे.









