मुलंबाळं लांब असलेली एकटय़ानं राहणारी म्हातारी माणसं अनेकदा फसतात. फसवली जातात. एकटय़ा राहणाऱया स्त्रिया सोशल मीडियावर कोणाशी तरी मैत्री करतात आणि तो मित्र त्यांना लाखो रुपयांचा गंडा घालतो, अशा बातम्या आपण अनेकदा वाचतो. फसवण्यासाठी लग्नाचेच आमिष दाखवायला हवे असे नसते. एका चांगल्या शिकल्या-सवरलेल्या प्रौढ स्त्रीला एका भामटय़ाने चंद्रावर आणि मंगळावर प्लॉट घेऊन देतो असे सांगून तिच्याकडून लाखो रुपये उकळले होते. वय वाढलेली माणसं मनात एकाकी असतील तर त्यांना कशाचीही चटकन भुरळ पडू शकते आणि ती फसतात, हा आपला एक अंदाज. खरं खोटं ती फसलेली माणसंच जाणोत.
स्त्रिया भाबडय़ा असतात आणि लबाड पुरुष त्यांना फसवतात. याउलट देखील घडू शकते. मध्यंतरी एका विशीतल्या मुलीने लग्नासाठी जाहिरात देऊन आलेल्या अनेक श्रीमंत स्थळांना होकार दिले आणि प्रत्येक पुरुषाला फसवून पोबारा केल्याची बातमी आली होती. अशाच आशयाचा ‘डॉली की डोली’ चित्रपट आठवतो. त्यातील नायिका(?) अनेक श्रीमंत पुरुषांना टोप्या घालते. शेवटी एक पोलीस अधिकारी तिला पकडतो आणि तिच्यात सुधारणा व्हावी म्हणून तिच्याशी लग्न करतो. ती त्यालाही फसवून पळून जाते.
गेले काही महिने वृत्तपत्रांच्या छोटय़ा जाहिरातींमध्ये ‘वर पाहिजे’ शीर्षकाखाली एका ठरावीक आशयाच्या जाहिराती सतत वाचनात येतात. लग्नेच्छू महिलेचे वर्णन साधारण असे असते. साठीच्या आसपास वयाची विनापत्य, विनापाश महिला. उच्च सरकारी-खाजगी नोकरी. मासिक वेतन-पेन्शन किमान एकदीड लाख रुपये. स्वतःच्या मालकीचा बंगला किंवा सदनिका. शिवाय दरमहा शेतीवाडीचे किंवा अन्य सहा आकडी उत्पन्न. वराकडून अपेक्षा.जातीची, धर्माची किंवा इतर कोणतीही अट नाही. या जाहिरातीतला एक तपशील कुतूहलजनक वाटतो. वयाच्या साठीपर्यंत थांबलेल्या या महिलेला आता मात्र त्वरित लग्नकर्तव्य असते. दुसरा तपशील म्हणजे एकदा आलेली जाहिरात तशीच्या तशी पुन्हा कधीच वाचायला मिळत नाही. म्हणजे एकदाच जाहिरात दिल्यावर पुन्हा जाहिरात देण्याची त्यांना गरज पडली नाही.
कोण जाणे, कदाचित या जाहिराती प्रामाणिक व्यक्तींनी दिलेल्या असतील, खऱया असतीलही. पण त्यांना, किंवा कोणत्याही अनोळखी व्यक्तींनी दिलेल्या जाहिरातींना प्रतिसाद देताना सर्व तपशिलांची खातरजमा केलेली केव्हाही चांगलीच. हा सल्ला माझ्या वयाच्या आणि एकाकी जीवन जगणाऱया, कोणाची तरी सोबत सर्वच आजोबांना आहे.








