रविवारची सकाळ. ऑनलाईन शाळेला सुट्टी होती. आजोबा वर्तमानपत्रातली शब्दकोडी सोडवीत होते. नातू मोबाईलवर खेळत होता. अचानक आजोबांना नातवाची आणि मराठीच्या भवितव्याची काळजी वाटू लागली. नातवाला जवळ बोलावून ते म्हणाले, “चल, तुझी परीक्षा घेतो. तुला आपली मातृभाषा किती येते… मी विचारीन त्या शब्दांचे अर्थ सांगायचे. तवकील म्हणजे काय, सांग पाहू.’’
“तुमचा वकील.’’
“चूक. तवकील म्हणजे गहू, जव, तांदूळ यांचे सत्त्व. आता नकील म्हणजे काय ओळख.’’ “नकील म्हणजे… ते देखील कसलं तरी सत्त्व असेल.’’ “पुन्हा चुकलास. नकील म्हणजे उंटाच्या नाकातील लगाम अडकवण्याची कडी. बरं, अवसाद म्हणजे काय सांग बघू.’’
“अव म्हणजे वाईट, साद म्हणजे हाक…. अवसाद म्हणजे वाईट हेतूने मारलेली हाक.’’
“अरेरे… कसं व्हायचं रे तुमच्या पिढीचं. वेडोबा, अवसाद म्हणजे डिप्रेशन. तुझं मराठीचं अगाध ज्ञान पाहून मला ते आलेलं आहे.’’
आजोबांनी नातवावर अधि÷ाता, अनुस्यूत, अवगाहन, अवगुंठन, एककाशीकर, दायकक्रमनिर्देशन, दारमदार, प्रसंविदा, लवणशर्कराविद्राव, वचा वगैरे शब्दांचा हल्ला केला. नातू घायाळ झाला. त्याला एकाही शब्दाचा अर्थ सांगता येईना. आजोबा विजयोन्मादाने हसले आणि हसता हसता गंभीर झाले. “खरंच, मराठी भाषेचं काय होणार, काही समजत नाही.’’
“आजोबा, मराठी भाषेला अजिबात धोका नाही. तुम्ही रोज शब्दकोडी सोडवता आणि त्यातले शब्द मला विचारले. आता तुम्ही मला विदा म्हणजे काय सांगा.’’ “हिंदी शब्द आहे. विदा म्हणजे निरोप. निरोप घेताना लोक अलविदा म्हणतात.’’
“साफ चूक, आजोबा. विदा म्हणजे डेटा किंवा डाटा. स्पर्शसोवळे, नवसामान्य, प्रतिनिधीवृंद म्हणजे काय सांगा बघू.’’
“स्पर्शसोवळे म्हणजे सोवळय़ातल्या व्यक्तीला शिवू नये असा संकेत, नवसामान्य म्हणजे नव्या पिढीतला सामान्य माणूस, प्रतिनिधीवृंद म्हणजे प्रतिनिधींचा जमाव.’’
“तिन्ही उत्तरे चुकली, आजोबा. स्पर्शसोवळे म्हणजे कोरोनाची लागण टाळण्यासाठी टाळलेला संपर्क, नवसामान्य म्हणजे न्यूनॉर्मल, प्रतिनिधीवृंद म्हणजे अमेरिकेतला इलेक्टोरल कॉलेज. तुम्ही ज्या पेपरातली शब्दकोडी सोडवता त्याच पेपरातले हे शब्द आहेत. पण आजोबा, पाश्चात्यांनी शोध लावायचा आणि आपण त्यासाठी मराठी नाव शोधायचे, त्यापेक्षा आपणच नवे शोध का लावत नाही?’’
हतबुद्ध आजोबा अवसाद अवस्थेत गेले.








