विजेच्या धक्क्याने दोघांचाही मृत्यू : संकेश्वरातील मड्डी गल्लीतील दुर्दैवी घटना, अन्य एकजण जखमी
प्रतिनिधी /संकेश्वर
विजेच्या धक्क्याने आजी व नातवाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास संकेश्वर येथील मड्डी गल्लीत घडली. शांतव्वा दुंडाप्पा बस्तवाडी (वय 78) व नातू सिद्धार्थ बापू बस्तवाडी (वय 25 रा. संकेश्वर) अशी मृतांची नावे आहेत. तर सिद्धार्थची आई राजव्वा बस्तवाडी हिच्या हाताला भाजल्याने ती जखमी झाली आहे. या दुर्दैवी घटनेने बस्तवाडी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, आजी शांतव्वा सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास घरातील परसात फुले तोडण्यास गेल्या होत्या. दरम्यान रात्री पाऊस झाल्याने परसात ओलावा निर्माण झाला होता. तसेच पावसामुळे परसात विद्युत दिव्यासाठी नेण्यात आलेली तार तुटून पडली होती. फुले तोडण्यासाठी गेल्यानंतर शांतव्या यांचा सदर तुटलेल्या तारेला स्पर्श झाला. यात त्यांना विजेचा जोराचा धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान फुले आणण्यास परसात गेलेली आजी अजून का परतली नाही म्हणून पाहणी करण्यासाठी नातू सिद्धार्थ गेला. यावेळी त्याला आजी जमिनीवर पडल्याचे दिसून आले. यावेळी त्याने तात्काळ आजीकडे धाव घेतली. यावेळी त्यालाही विजेचा धक्का बसला. यात त्याचाही मृत्यू झाला. दरम्यान, सिद्धार्थची आई राजव्वा ही परसात आली होती. यावेळी शांतव्वा व सिद्धार्थ दोघेही निपचित पडल्याचे पाहून तिनेही त्यांना स्पर्श करताच तिला विजेचा धक्का बसला. यात तिच्या हाताला भाजल्याने राजव्वाने आरडाओरड केली. राजव्वाचा आवाज ऐकताच नणंद सरोजिनी हिने परसात धाव घेत घटनेचे गांभीर्य ओळखून घराच्या बाहेर येत नागरिकांना मदतीसाठी बोलाविले. यानंतर शेजारचे नागरिक जमा झाले. यावेळी विजेची तार तुटून पडल्याचे आढळून येताच प्रथम विद्युgत पुरवठा खंडित करण्यात आला. यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
आजी-नातवाच्या मृत्यूने हळहळ सकाळी सारे कांही सुरळीत असतानाच अचानकपणे आरडाओरड सुरू झाली. यामुळे गल्लीतील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा त्यांना आजी व नातू मृतावस्थेत पडल्याचे पाहून धक्काच बसला. यामुळे हळहळ व्यक्त होत होती.









