वडिलांना दररोज भेटण्याकरता मुलीचे अनोखे पाऊल
जीवनात आईवडिलांपेक्षा काहीच मोठे नसते. कोरोनाकाळात अनेकांनी स्वतःच्या प्रियजनांना गमाविले आहे. लोकांनी रुग्णालयात स्वकीयांपासून दूर अखेरचा श्वास घेतला आहे. अनेक जणांना स्वतःच्या कुटुंबीयांना भेटता देखील आले नाही. रुग्णालयात आजारी व्यक्तीला भेटायला जाणेही अवघड ठरले आहे. अशा स्थितीत एका मुलीने स्वतःच्या वडिलांसाठी रुग्णालयातच काम करणे सुरू केले आहे.
लिसा रेसीन असे या महिलेचे नाव आहे. ती पेशाने प्रकल्प व्यवस्थापक असून एका प्रिंटिंग कंपनीत काम करते. तिने अलिकडेच मिन्नेसोटाच्या स्टीलवॉटर फॅसिलिटीमध्ये पार्टटाईम काम करण्यास सुरुवात केली आहे.
वडिलांसोबत वेळ घालविण्यासाठी धडपड
लिसा आठवडय़ात 3 ते 4 रात्री या रुग्णालयात काम करते. स्वतःच्या 87 वर्षीय वडिलांसोबत अधिकाधिक वेळ घालविता यावा म्हणून तिने ही काम पत्करले आहे. माझा दिनक्रम लवकर सुरू केले. सर्वसाधारणपणे मी लवकर येते, मी माझ्या वडिलांना पाहते, त्यांना जेवण वाढते, त्यानंतर पुन्हा त्यांची विचारपूस करते. माझे काम संपल्यावर पुन्हा त्यांना जाऊन पाहते असे लिसा हिने म्हटले आहे.
कामाचे स्वरुप
या रुग्णालयात तिची डय़ूटी कपबोर्ड्स आणि रेफ्रिजरेटरचा स्टॉक भरणे, भांडी धुणे, फरशी साफ करणे, जेवण वाढणे, जेवल्यावर टेबल साफ करण्याची आहे. लिसा 1 डिसेंबरपासून येथे काम करत आहे. यापूर्वी ती स्वतःच्या वडिलांना पाहण्यासाठी खिडकीतून डोकावत होती.









