36 दिवसात 92 हजार मे. टन ऊसाचे गाळप
आजरा / प्रतिनिधी
आजरा साखर कारखान्याने यावर्षीचा गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर गेल्या 36 दिवसांच्या काळात तब्बल 92 हजार मे. टन ऊसाचे गाळप केले आहे. तर दर दहा दिवासांचे ऊस बील तसेच तोडणी वाहतूक बिलेही कारखान्याकडून अदा केली जात असल्याने शेतकरी तसेच तोडणी वाहतूक यंत्रणेकडूनही समाधान व्यक्त होत आहे.
आर्थिक अडचणींमुळे गेली दोन वर्षे बंद असणारा आजरा साखर कारखाना चेअरमन सुनील शिंत्रे आणि संचालक मंडळाने कारखाना सहकारातच चालविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि कारखान्याचे संचालक मंडळ, आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील आर्थिक संस्थांच्या सहकार्याने जिल्हा बँकेचे थकीत कर्ज भरून नव्याने कर्ज उचल केली गेली. संस्थांकडून मदत म्हणून घेण्यात आलेल्या रक्वमा परत करून उपलब्ध असलेल्या रक्कमेवर कारखाना सुरू करण्यात आला.
कारखान्याच्या कामगारांनी दिलेल्या योगदानामुळे हंगाम सुरू झाल्यानंतर काही दिवसातच कारखान्या गाळपाची चांगली गती पकडली. अवकाळी पावसाचे नैसर्गिक संकट ओढवलेले असतानाही व्यवस्थापन मंडळ, विभाग प्रमुख आणि कर्मचाऱयांनी न डगमगता नियोजनबद्ध काम सुरू ठेवले आहे. त्यामुळेच कारखान्याने यंदाच्या हंगामात 36 दिवसात तब्बल 92 हजार मे. टन ऊसाचे गाळप केले असून 1 लाख क्वींटल साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. सरासरी साखर उताराही 10.92 इतका असल्याने साखरेचे चांगले उत्पादन होत आहे.
याशिवाय गेल्या 36 दिवसात गाळप केलेल्या ऊसापैकी दर दहा दिवसाला अशी 20 दिवसांची ऊस बीले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहेत. लवकरच तिसऱया दहा दिवसांची बीलेही शेतकऱयांना अदा केली जाणार आहेत. कारखान्याने प्रती टन 2900 रूपये प्रमाणे 10 नोव्हेंबर गाळप केलेल्या 22 हजार 616 टन ऊसाचे 6 कोटी 56 लाख ऊस बील तर 1 कोटी 19 लाखांचे तोडणी वाहतूक बील तसेच 11 ते 20 नोव्हेंबर गाळप केलेल्या 30 हजार 11 मे. टन ऊसाचे बील 8 कोटी 66 लाख रूपयांचे ऊस बीलही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर भरले आहे.
कारखान्याच्या संचालक मंडळाने अतिशय काटेकोर नियोजन केल्यामुळे शेतकऱयांची देणी वेळेत देणे शक्य होत आहे. त्यामुळे गेली दोन वर्षे बंद असला तरी कारखान्याचा यंदाचा हंगाम अतिशय उत्तम पद्धतीने सुरू असून यावर्षी कारखाना परिसर गजबल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. कारखान्याचा अड्डा ऊसाचे ट्रक आणि ट्रक्टरने भरला असल्याचे चित्र गेल्या दोन वर्षानंतर यावर्षी पहावयास मिळत आहे. तर कारखाना सुरू झाल्यामुळे कारखाना परीसरातील व्यावसायिकांची दुकानेही नव्या जोमाने सुरू झाली असून अनेकांना रोजगार उपलब्ध झाल्याने या लोकांमधूनही समाधान व्यक्त होताना दिसत आहे









