50 टक्के उद्योग सुरू होण्याची शक्मयता
प्रतिनिधी/ बेळगाव
जिल्हय़ाचे आर्थिक व्यवहार सुरळीत व्हावेत, याकरिता सोमवारपासून औद्योगिक वसाहती सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार शहर व परिसरातील 50 टक्के उद्योग सुरू होण्याची शक्मयता वर्तविली जात आहे. काही उद्योजकांनी याची कर्मचाऱयांना माहिती दिली असून सोमवारपासून कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तब्बल सव्वा महिन्यानंतर उद्योगांची चाके फिरणार आहेत.
बेळगावमध्ये उद्यमबाग, मच्छे, वाघवडे, अनगोळ, काकती, होनगा या भागामध्ये औद्योगिक वसाहत विस्तारली आहे. येथे रोज 10 हजारांहून अधिक कामगार काम करीत असतात. मोठय़ा उद्योगांबरोबरच लहान-मोठे शेकडो उद्योग या औद्योगिक वसाहतीमध्ये आहेत. सोमवारपासून 40 ते 50 टक्के कर्मचारी घेऊन उद्योग सुरू करण्यात येणार आहेत. पहिल्याच दिवशी मशीन सुरू करणे तसेच इतर प्राथमिक कामे करण्यासाठीच वेळ लागणार आहे. एकदा सुरुवात झाल्यानंतर काही दिवसांमध्ये कामाला सुरळीत सुरुवात होईल, असा अंदाज उद्योजक व्यक्त करीत आहेत.
थर्मल स्क्रिनिंगसाठी उद्योजकांनी एकत्र येण्याची गरज
सरकारच्या नियमावलीनुसार प्रत्येक कर्मचाऱयाचे थर्मल स्क्रिनिंग करणे गरजेचे आहे. परंतु बेळगावमध्ये 1-2 मशीन असणारे लहान उद्योजक आहेत. त्यांना थर्मल स्क्रिनिंगसाठी वापरले जाणारे यंत्र खरेदी करणे शक्मय नाही. त्यामुळे अशा 5 ते 6 उद्योजकांनी एकत्रित येऊन हे यंत्र खरेदी केल्यास त्याचा फायदा होणार असून आर्थिक नुकसानही टाळता येणार आहे.
कच्चा माल मिळणार कसा?
बेळगाव परिसरात जास्तीत जास्त फाऊंड्री व त्यावर आधारित उद्योगधंदे आहेत. मागील महिन्याभरापासून हे उद्योग बंद आहेत. त्यामुळे या उद्योगांसमोर कच्च्या मालाचा मोठा प्रश्न आहे. सध्या वाहतूकही होत नसल्याने स्क्रॅप आणणार कोठून असा प्रश्न या उद्योजकांसमोर आहे. एखादा पार्ट तयार केल्यानंतर त्याला रंग व हार्डवेअरची आवश्यकता असते. त्यामुळे ही दुकाने उघडणेही गरजेचे असल्याचे मत उद्योजकांमधून व्यक्त केले जात आहे.









