प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाचा संसर्ग काहीसा कमी झाल्यानंतर राज्य सरकारने बेळगावसह इतर जिल्हय़ांमध्ये अनलॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार दि. 21 पासून अनलॉकची प्रक्रिया राबविली जाणार आहे. यामुळे सोमवारपासून शिक्षकांनी शाळेवर हजर राहण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून करण्यात आल्या आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने मार्च महिन्यापासून शाळा बंद ठेवण्यात आल्या. मध्यंतरी रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाल्याने शाळांच्या बाबतीत प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. मागील आठवडय़ात कोरोना रुग्ण कमी असणाऱया जिल्हय़ांमध्ये अनलॉक करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यामुळे शाळांवर हजर राहण्याचा आदेश बजावण्यात आला होता. परंतु अनेक जिल्हय़ांमध्ये लॉकडाऊन कायम असल्याने शिक्षकांमधून विरोध होताच त्यांना वर्क फ्रॉम होमची व्यवस्था करून देण्यात आली
होती.
आठवडाभरानंतर उर्वरित जिल्हय़ांमध्येही अनलॉक करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे सोमवारपासून शाळा सुरू करून स्वच्छता करण्याच्या सूचना शिक्षकांना करण्यात आल्या आहेत. शाळांमध्ये हजर राहून विद्यार्थ्यांना विविध उपक्रम देण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. अद्याप विद्यार्थी शाळेपर्यंत येण्यास वेळ असल्याने त्यांना ऑनलाईनद्वारे अभ्यास देण्यात यावा. जोपर्यंत शिक्षण विभाग सूचना करत नाही, तोवर विद्यार्थ्यांना शाळेला बोलावून घेऊ नये, असे आदेशही शिक्षण खात्यातर्फे देण्यात आले आहेत.









