जिल्हय़ातील 5 हजार 300 शाळांचा समावेश
प्रतिनिधी/ बेळगाव
राज्यात सोमवार दि. 16 पासून शाळा गजबजणार आहेत. यावषी 15 दिवस अगोदर शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. जिल्हय़ातील 5 हजार 300 शाळांमध्ये महिन्याभरानंतर विद्यार्थ्यांचा किलबिलाट होणार आहे. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शिक्षकांनीही जय्यत तयारी केली आहे. यावषी विद्यार्थ्यांसाठी आखण्यात आलेल्या लर्निंग रिकव्हरी प्रोजेक्टसाठी पहिल्या दिवशीपासूनच अभ्यासाला सुरुवात केली जाणार आहे.
दरवषी मे अखेरीला शाळा सुरू केल्या जात होत्या. परंतु यावषी 2022-23 या शैक्षणिक वर्षाला 16 मे पासून सुरुवात होत आहे. कोरोना काळात विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी लर्निंग रिकव्हरी प्रोजेक्ट शिकविला जाणार आहे. यामुळे मागील इयत्तांमध्ये जे सामर्थ्य येणे गरजेचे होते ते आता या उपक्रमातून शिकविले जाणार आहे. शनिवारपासून शिक्षक शाळांवर दाखल झाले. शनिवारी शाळांची स्वच्छता करण्यात आली. तर रविवारी एसडीएमसी व पालकांची बैठक घेण्यात आली.
अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी तोरणे बांधण्यात आली आहेत. तर काही शाळांमध्ये आकर्षक अशा फुलांची सजावट करण्यात आली आहे. गटशिक्षणाधिकारी तसेच इतर अधिकाऱयांनी शाळांना भेटी देऊन माहिती जाणून घेतली.
ः बसवराज नलतवाड (जिल्हा शिक्षणाधिकारी)
कोरोना जरी कमी झाला असला तरी सर्व खबरदारी शिक्षण विभागाकडून घेतली जाणार आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ात 1 हजार 400 वर्गखोल्या जीर्ण झाल्या असल्यामुळे त्या वर्गखोल्या व्यतिरिक्त इतर खोल्यांमध्ये वर्ग भरविले जाणार आहेत. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांची सुरक्षादेखील तीतकीच महत्त्वाची असल्याचे जिल्हा शिक्षणाधिकाऱयांनी सांगितले.
केवळ 41 टक्के पाठय़पुस्तके दाखल
यावषी काही इयत्तांच्या समाज विज्ञान व कन्नड विषयांच्या पुस्तकांमध्ये बदल करण्यात आला आहे. उर्वरित विषयांची पुस्तके सारखीच असल्यामुळे या पुस्तकांचे वितरण सुरुवातीला केले जाणार आहे. बेळगाव जिल्हय़ात 26 लाख 9 हजार 713 पाठय़पुस्तकांची आवश्यकता असताना केवळ 10 लाख 94 हजार 966 पुस्तके दाखल झाली आहेत. त्यामुळे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे जुन्याच पुस्तकांच्या आधारे विद्यार्थ्यांना काही दिवस अभ्यास करावा लागणार आहे.









