राज्य सरकारचा निर्णय : नवी मार्गसूची जारी : सरकारी कर्मचाऱयांना आठवडय़ातील 5 दिवस काम
प्रतिनिधी/ बेंगळूर
लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर राज्यात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने शनिवारी अनेक ठोस निर्णय घेतले असून आजपासून (28 जून) राज्यात दररोज रात्री कर्फ्यू आणि पुढील महिन्यापासून प्रत्येकी रविवारी कडक लॉकडाऊन जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. याच दरम्यान, खबरदारी म्हणून सरकारी कर्मचाऱयांना आठवडय़ातील पाच दिवस काम करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असल्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी हाती घ्यावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी शनिवारी सायंकाळी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी बेंगळूरमधील ‘कावेरी’ या निवासस्थानातील उद्यानात मंत्री व वरिष्ठ अधिकाऱयांशी चर्चा केली. यावेळी अनेक महत्त्वाच्या मुद्दय़ांवर चर्चा करण्यात आली. सध्या दहावी परीक्षा असल्याने 5 जुलैपासून प्रत्येक रविवारी लॉकडाऊन कडक लॉकडाऊन जारी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर आजपासून (रविवार 28 जून) रात्री 8 ते पहाटे 5 पर्यंत संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
परंतु, जीवनावश्यक सेवा नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्यास परवानगी राहणार आहे. त्याचप्रमाणे अत्यावश्यक वस्तुंची वाहतूक वगळता प्रवासी वाहतूक सेवा बंद राहणार आहे. त्यामुळे रात्रीच्या कालावधीत सुरू करण्यात आलेली प्रवासी वाहतूक करणाऱया बस, टॅक्सी, कॅब इतर वाहनांचा संचार बंद राहणार आहे. दुकाने, बाजारपेठा तसेच इतर सर्व व्यवहार या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहेत. या नियमांची अंमलबजावणी 28 जूनपासूनच केली जात आहे.
दोन दिवस कार्यालये बंद
कोरोना संसर्गाच्या भीतीखाली वावरणाऱया कर्मचाऱयांनाही सरकारने काही प्रमाणात दिलासा दिला असून येत्या सोमवारपासून (दि. 29 जून) प्रत्येक आठवडय़ात पाच दिवस काम निर्धारित करण्यात आले आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱयांना शनिवार व रविवार असे सलग दोन दिवस सुटी मिळणार आहे. त्यामुळे सर्व शासकीय कार्यालये आठवडय़ाच्या शेवटी दोन दिवस बंद राहणार आहे. परिणामी जनतेला काही प्रमाणात गैरसोयींचा सामना करावा लागणार आहे. ही नवी मार्गसूची सरकारच्या पुढील आदेशापर्यंत जारी राहणार आहे.
शनिवारच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी शनिवारी देखील राज्यव्यापी संपूर्ण लॉकडाऊन जारी करण्याबाबत मत व्यक्त केले. तथापि, पुढील बैठकीत परिस्थितीनुरुप याबाबत निर्णय घेण्यात येईल, असा सल्ला मंत्री आणि अधिकाऱयांनी मुख्यमंत्र्यांना दिला. याच दरम्यान, राज्यात स्वॅब तपासणीचे प्रमाण वाढविणे, रुग्णांच्या उपचारासाठी कोविड इस्पितळांची संख्या वाढविणे, जनतेमध्ये जागृती करणे या मुद्दय़ांवरही विस्तृत चर्चा झाली.
बैठकीत महसूल मंत्री आर. अशोक, गृहमंत्री बसवराज बोम्माई, मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव विश्वनाथ, सरकारचे मुख्य सचिव टी. एम. विजयभास्कर, अप्पर मुख्य सचिव रविकुमार, बेंगळूर महापालिकेचे आयुक्त अनिलकुमार, महसूल खात्याचे मुख्य सचिव मंजुनाथ प्रसाद आदी सहभागी झाले होते.









