राजधानीत आज तर उद्या मडगावात मिरवणूक : सुमारे 54.70 लाख रु. खर्च करणार : पर्यटनमंत्री आजगावकर यांची माहिती
प्रतिनिधी / पणजी
राजधानी पणजीसह राज्यात आज शनिवार दि. 13 पासून कार्निव्हलचा धुमधडाका सुरू होणार आहे. यासाठी सुमारे 54.70 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी दिली.
आतापर्यंत कार्निव्हलसाठी 31 चित्ररथांची नोदंणी झाली असून आज शनिवारी पणजीत, तर उद्या रविवारी (14 रोजी) मडगावात कार्निव्हल मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. पणजीतील मिरवणूक दुपारी 3 वाजता जुन्या सचिवालयाकडून सुरू होणार असून त्याच ठिकाणी कार्निव्हलचा शुभारंभ करण्यात येणार आहे, असे मंत्री आजगावकर यांनी सांगितले.
ते म्हणाले की, दरवर्षी राज्यात विविध ठिकाणी मिळून 7 कार्निव्हल मिरवणुकी होतात. परंतु यंदा कोरोना सकंटामुळे पणजी व मडगाव या दोनच ठिकाणी मिरवणूक होणार आहेत. राज्यातील पर्यटन वाढावे तसेच प्रोत्साहन मिळावे म्हणून कार्निव्हल करण्यात येणार आहे. तो बंद केला तर गोव्याच्या पर्यटनावर मोठे परिणाम होतील आणि राज्य पर्यटनात मागे पडण्याचा धोका आहे. म्हणून कार्निव्हल मिरवणुकीला विरोध करणाऱयांनी त्यामागील उद्देश लक्षात घ्यावा, असे आवाहन करून त्यांनी सहकार्याची मागणी केली. कार्निव्हल साजरा करताना कोरोनाचे सर्व नियम व अटी पाळण्याची सूचना त्यांनी सर्वांना केली आहे.
एरिक डायस बनणार ‘किंग मोमो’
एरिक डायस यांची ‘किंग मोमो’ म्हणून नेमणूक केली आहे, असे त्यांनी सांगितले. गोव्यातील टॅक्सीवाले पर्यटकांना लुटतात, अशा तक्रारी येत असल्याने व टॅक्सींना मीटर बसवण्यास नकार देण्यात आल्याने गोवा माईल्सची सेवा गोव्यात आल्याची माहिती आजगावकर यांनी दिली. टॅक्सवाल्यांनी मीटर बसवले असते तर ती सेवा गोव्यात आलीच नसती, असा दावा त्यांनी केला. आता त्याबाबत निर्णय वाहतूकमंत्री घेतील, असे आजगावकर म्हणाले.
नोंदणी नसलेली हॉटेल्स शोधणार !
अनेक हॉटेल्सनी नोंदणी न करताच व्यवसाय सुरू केला असून त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा मंत्री बाबू आजगावकर यांनी दिला आहे. अशा हॉटेल्समुळे पर्यटकांची नेमकी संख्या मिळत नाही. नोंदणी नसलेली हॉटेल्स शोधून काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.









