मालवण:
महाराष्ट्रासह देशाच्या पश्चिम किनाऱ्यावरील गुजरात, गोवा, कर्नाटक आणि केरळ राज्यांमध्ये आजपासून सागरी मासेमारीस प्रारंभ होणार आहे. मागील दोन वर्षांपासून क्यार, निसर्ग आणि तौक्तेसारख्या महाचक्रीवादळांचा जबरदस्त तडाखा किनारपट्टीला बसला आहे. तसेच कोरोना महासाथीचा परिणाम मत्स्य व्यवसायावर झाला. यंदा मत्स्य हंगामाची सुरूवात चांगली व्हावी, या अपेक्षेनेच 1 ऑगस्टपासून मच्छीमार पुन्हा दर्यावर स्वार होणार आहे.
सध्या समुद्राकडून जमिनीकडे वाहणाऱया बारदानी वाऱयांचा मोसम आहे. त्यामुळे समुद्रात थोडी ‘हय़ेस’ म्हणजेच समुद्र काहीसा खवळलेल्या स्थितीत असल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात पहिल्याच दिवशी पूर्ण क्षमतेने मासेमारी सुरू होण्याची शक्यता कमी आहे. विशेषकरून सिंधुदुर्गातील ट्रॉलर्सची मासेमारी मोठय़ा संख्येने सुरू होईल, अशी चिन्हे दिसत नाहीत. खराब हवामानामुळे मालवण बंदरात ट्रॉलर मासेमारीस सज्ज झाल्याचे चित्र पहावयास दिसत नव्हते. रविवारी पहाटे आऊटबोट यमाहा इंजिनच्या साहय़ाने मासेमारी करणाऱया फायबरच्या नौका जास्त संख्येने मासेमारीस जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे रविवारी सकाळी मत्स्य खवय्यांना विविध प्रकारची मच्छी विपुल प्रमाणात उपलब्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सिंधुदुर्गात अशीही काही मच्छीमार गावे आहेत की, ज्या गावांमधील सागरी मासेमारी ही साधारणत: पावसाळय़ा संपल्यावरच सुरू होते. कारण अशा गावातील मच्छीमारांना समुद्रात जाण्यासाठी अनुकूल वातावरण किनाऱयावर नसते. त्यांना समुद्र पूर्णत: शांत होण्याची वाट पहावी लागते.
गस्ती नौकेस मान्यता नाही
गेल्या काही वर्षांमध्ये असे दिसून आले की, मत्स्य हंगामाच्या सुरूवातीलाच परराज्यातील मोठे हायस्पीड ट्रॉलर्स महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत (बारा सागरी मैल) घुसून कोटय़वधी रुपयांची मासळी लुटून नेतात. मत्स्य विभागाकडून अशा ट्रॉलर्सवर अधून-मधून कारवाई होत असली, तरी त्यांचे अतिक्रमण पूर्णत: बंद होत नाही. यावर्षीदेखील ही समस्या कायम राहण्याची चिन्हे आहेत. कारण मत्स्य विभागाच्या गस्ती नौकेस अद्याप मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे परराज्यातील ट्रॉलर्सनी अतिक्रमण केले, तर त्यांना पकडायचे कोणी? हा प्रश्न उपस्थित होतो आहे. एलईडी दिव्यांच्या साहय़ाने होणाऱया बेकायदेशीर पर्ससीन मासेमारीला लगाम घालण्यात यावर्षी तरी केंद्र आणि राज्य सरकारला यश येणार की पारंपरिक मच्छीमारांना पुन्हा उपोषण आंदोलनाचे अस्त्र उपसावे लागणार याकडेदेखील सर्वांचे लक्ष असणार आहे.









