मासळीचे प्रजनन, खवळलेल्या समुद्रामुळे असते बंदी
प्रतिनिधी / पणजी
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार गोवा सरकारने मच्छीमारी बंदीचा काळ 15 दिवसांनी कमी केला होता, तरी या गेल्या 15 दिवसात मच्छीमार मात्र समुद्रात जाऊ शकले नाहीत. त्यामुळे ‘निसर्गा’नेच मच्छीमारी बंद केली. आज दि. 16 जूनपासून अधिकृतपणे मच्छीमारी बंदीची अंमलबजावणी होत असून ती 31 जुलैपर्यंत राहील.
वार्षिक 1 जूनपासून ही बंदी सुरु व्हायची, मात्र यावर्षी राज्य सरकारने ती 16 जूनपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला. मच्छीमारी करण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी वाढवून दिला, तरी या 15 दिवसांचा वापर मच्छीमारी मच्छीमारीसाठी करू शकले नाहीत. निसर्गाने मच्छीमारी बंदी काळ ठरवून दिलेला आहे. परंतु सरकारने त्यात हस्तक्षेप केला. त्यामुळे मच्छीमारीसाठी 15 दिवसांचा अतिरिक्त कालावधी वाढवून मिळाला असला तरी ‘निसर्ग’ नावाचे चक्रिवादळ निसर्गाने तयार केले. हे वादळ येणार म्हणून 3 ते 4 दिवस अगोदर मच्छीमारी बंद झाली. त्यानंतर वातावरण निवळण्यासाठी आणखी सहा दिवस गेले. त्यानंतर पुन्हा मुसळधार पाऊस व समुद्र खवळेला. यामुळे मच्छीमारांना मिळालेली 15 दिवसांची अतिरिक्त मुदत पाण्यात गेली.
साठ दिवसांची मच्छीमारी बंदी शास्त्रीय
वास्तविक मच्छीमारीवर 60 दिवस बंदी असते. मे अखेरीस व जूनच्या पहिल्या पंधरवडय़ात मासे अंडी घालतात. त्यानंतर अंडय़ातून छोटे छोटे मासे जन्माला येतात. पावसाळय़ात मोठय़ा प्रमाणात जमिनीवरील पाणी वाहून येत समुद्राला मिळते. या माती मिश्रीत पाण्याबरोबर घाणही वाहून येते. त्यातून माशांचे खाद्य होते. मासे वाढतात. पावसाचे प्रमाण थोडे कमी झाल्यावर साधारणतः ऑगस्टच्या पहिल्या वा दुसऱया आठवडय़ात मासेमारी करण्यास हरकत नसते. त्या दरम्यान मासे पूर्ण वाढलेले असतात. म्हणून शास्त्राrय दृष्टय़ा ही मासेमारी बंदी केलेली असते. खवळलेला समुद्रराजा शांत झाल्यावर त्याला नारळ अर्पण करुन नारळीपौर्णिमेच्या मुहुर्ताने पुन्हा मच्छीमारी सुरु होते.
ऑगस्टपर्यंत बंद राहणार मच्छीमारी
अलिकडच्या काळात सरकारी पातळीवर निर्णय बदलत असतात. यंदाही सरकारने ही बंदी पंधरा दिवसांनी पुढे ढकलली. अनेकांनी तिला विरोध केला. सरकारने निर्णय बदलला तरी निसर्गाने हा निर्णय बदलण्यास दिला नाही. निसर्गामध्येच असा बदल घडून आला की मच्छीमारी करणे शक्यच झाले नाही. सरकारने दिलेली मुदतवाढ सोमवारी संपुष्टात आली. आजपासून राज्यात अधिकृतपणे मासेमारी बंद होत आहे. पुढील 47 दिवस म्हणजे साधारणतः 2 ते 3 ऑगस्टपर्यंत मासेमारी बंद राहील.









