प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाचा धोका वाढल्यापासून मंदिरे बंद करण्यात आली होती. यामुळे भाविकांना घरांमध्येच पूजा करावी लागत होती. कर्नाटक सरकारच्या आदेशानुसार सोमवार दि. 8 जूनपासून मंदिरे खुली करण्यात येणार आहेत. काही नियम व अटी पाळूनच भाविकांना देवाचे दर्शन घेता येणार आहे. सोमवारपासून मंदिरे खुली होणार असल्याने रविवारी स्वच्छता व रंगरंगोटी केली जात होती.
मंदिरे बंद असल्यामुळे ती केव्हा सुरू होणार याची आस भाविकांना लागली होती. दररोज मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेतल्याशिवाय अनेकांचा दिवस सुरू होत नाही. अशा भाविकांना घरांमध्ये राहूनच देवाची पूजा करावी लागली. अखेर प्रशासनाने सोमवारपासून परवानगी दिल्यामुळे पुन्हा एकदा देवाच्या दारात भाविकांना जाता येणार आहे.
बेळगावमधील प्रमुख मंदिरांमध्ये रविवारी सकाळपासून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. काही मंदिरांमध्ये रंगरंगोटीही करण्यात आली. अडीच महिने मंदिरे बंद असल्यामुळे सर्व धार्मिक विधी बंद होते. आता सोमवारपासून ते पुन्हा पूर्ववत सुरू होणार आहेत. मंदिर ट्रस्टकडून आवश्यक त्या खबरदारी घेतल्या जात आहेत. सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझर यांचा वापर करूनच भाविकांना दर्शन घ्यावे लागणार आहे.
कपिलेश्वर मंदिरात होणार थर्मल स्क्रिनिंग
दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरात रविवारी सकाळी संपूर्ण मंदिर सॅनिटाईज करण्यात आले. वातावरण शुद्धीसाठी कालसर्प शांती करण्यात आली. चिक्कमंगळूर येथील दत्तात्र्येय मठाचे अशोकजी शर्मा यांनी पौरोहित्य केले. सोमवारी सकाळी 6 वाजल्यापासून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे. मास्क घातलेल्या भाविकांनाच प्रवेश असणार आहे. नारळ, फुले स्वीकारली जाणार नसून थर्मल स्क्रिनिंग करूनच प्रवेश दिला जाणार असल्याचे मंदिर ट्रस्टतर्फे कळविण्यात आले आहे.
जोतिबा देवस्थान दख्खनचा राजा म्हणून ओळख असणाऱया जोतिबाचे बेळगावमध्ये अनेक भक्त आहेत. शिवबसव नगर येथील जोतिबा मंदिरात शेकडो भक्त दर्शनासाठी जातात. सोमवार दि. 8 पासून हे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे. प्रशासनाच्या नियमावलीनुसार मंदिर ट्रस्टने सर्व व्यवस्था केली आहे. भाविकांनी सूचनांचे पालन करून दर्शन घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.









