अल्प प्रतिसादामुळे नैर्त्रुत्य रेल्वे प्रशासनाचा निर्णयः अवघे 15 दिवस चालल्या पॅसेंजर
प्रतिनिधी / बेळगाव
नैर्त्रुत्य रेल्वेने अवघ्या 15 दिवसांपूर्वी सुरू केलेल्या दोन पॅसेंजर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांचा अल्पप्रतिसाद मिळत असल्याने बेळगाव-शेडबाळ व हुबळी-शेडबाळ या दोन पॅसेंजर गुरुवारपासून बंद करण्यात येणार आहेत. परंतु यामुळे बेळगाव जिल्हय़ातील प्रवाशांचे पुन्हा एकदा हाल होणार आहेत.
पॅसेंजर सुरू करण्याची मागणी केली जात होती. परंतु नैर्त्रुत्य रेल्वेकडून त्याला हिरवा कंदील मिळत नव्हता. मागील काही महिन्यांमध्ये कोरोना संसर्ग काही प्रमाणात कमी झाल्यामुळे पॅसेंजर सुरू करण्याचा निर्णय नैर्त्रुत्य रेल्वेने घेतला होता. बेळगावमधून 2 पॅसेंजर सुरू करण्यात आल्या होत्या. हुबळी-शेडबाळ, बेळगाव- शेडबाळ पॅसेंजर 10 एप्रिलपासून धावत होत्या.
परंतु एप्रिल महिन्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रवासी संख्येत घट झाली. त्यामुळे नैर्त्रुत्य रेल्वेने एकूण 12 पॅसेंजर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामधील हुबळी-शेडबाळ-हुबळी (07345/07346) व बेळगाव-शेडबाळ-बेळगाव (07351/07352) रेल्वे गुरुवारपासून बंद करण्यात येणार आहेत.
चुकीच्या वेळेमुळे प्रवाशांनी फिरविली पाठ
नैर्त्रुत्य रेल्वेने पॅसेंजर जरी सुरू केल्या असल्या तरी त्या प्रवाशांना सोयीच्या ठरत नव्हत्या. रेल्वेच्या चुकीच्या वेळापत्रकामुळे प्रवाशांनी पॅसेंजरकडे पाठ फिरविली आहे. बेळगाव जिल्हय़ात पॅसेंजरमधून प्रवास करणाऱयांची संख्या अधिक असूनही रेल्वेच्या चुकीच्या वेळापत्रकामुळे प्रवासी कमी झाले आहेत. प्रवाशांच्या वेळेनुसार पॅसेंजर सुरू केली असती तर प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असता, अशी प्रतिक्रिया प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.