प्रतिनिधी/ बेळगाव
दिल्ली-बेळगाव-दिल्ली ही विमानफेरी आजपासून दररोज असणार आहे. आठवडय़ातून चार दिवस असणारी विमानफेरी आता दररोज असल्याने प्रवाशांना अवघ्या अडीच तासांमध्ये बेळगावमधून दिल्लीला पोहोचता येणार आहे. या विमानफेरीमुळे केवळ बेळगावच नव्हे तर कोल्हापूर, सांगली, हुबळी, कारवार येथील नागरिकांची सोय होणार आहे.
बेळगाव हे थ्री टायर शहर असल्याने विकासाला मोठी संधी आहे. दिल्ली या देशाच्या राजधानीला पोहोचण्यासाठी रेल्वेने बराच कालावधी लागत होता. तर विमानाने जाण्यासाठी एकतर मुंबई, हैदराबाद, बेंगळूर अथवा गोवा येथून प्रवास करावा लागत होता. बेळगावमध्ये मराठा लाईट इन्फंट्री, एअरफोर्स यांचे मुख्यालय, एकससारखी मल्टीनॅशनल कंपनी तसेच उद्योजक, राजकारणी यांचे नेहमी दिल्लीला येणे-जाणे असते. त्यामुळेच बेळगाव-दिल्ली विमानफेरी सुरू करण्याची मागणी होत होती.
दि. 13 ऑगस्ट 2021 पासून या विमानफेरीला सुरुवात झाली. सुरुवातीला आठवडय़ातील 2 दिवस असणारी विमानफेरी नंतर 4 दिवस करण्यात आली. तरीही प्रवाशांची संख्या अधिक असल्यामुळे आता 29 मार्चपासून दररोज दिल्लीला विमानाने प्रवास करता येणार आहे. स्पाईसजेटने तशी संधी बेळगावच्या प्रवाशांना दिली आहे. या फेरीमुळे बोईंग विमान बेळगावला पुन्हा एकदा मिळाले.
दिल्ली विमान नेहमीच ‘हाऊसफुल्ल’
बेळगावच्या प्रवाशांनी दिल्ली-बेळगाव-दिल्ली या विमानफेरीला उत्तम प्रतिसाद दिला आहे. सध्या 189 आसन क्षमता असणारे विमान सेवा देत आहे. प्रत्येक फेरीवेळी विमान हाऊसफुल्ल होत आहे. शनिवारी 175 प्रवासी दिल्लीहून बेळगावला आले तर 185 प्रवासी बेळगावहून दिल्लीला गेले. या विमानफेरीमुळे बेळगाव विमानतळाला नवी ओळख मिळाली आहे.
दिल्लीहून सकाळी 6.05 वा. सुटणारे विमान बेळगावला सकाळी 8.45 वा. पोहोचेल व परतीच्या प्रवासासाठी बेळगावहून सकाळी 9.15 वा. सुटून दिल्ली येथे सकाळी 11.45 वा. पोहोचेल.









