सकाळी 7 ते सायं. 7 वाजेपर्यंतच व्यवसाय : सायंकाळी 7 नंतर संचारबंदी : 144 कलम 17 मेपर्यंत लागू
बंद | खुले |
रेस्टॉरंट | सरकारी कार्यालये |
मॉल | बसगाडय़ा |
स्पा | रिक्षा |
मसाज पार्लर | टॅक्सी |
पान शॉप | घाऊक दारु विक्रेते |
खाद्य स्टॉल | केशकर्तनालये |
ढाबा | मासळी मार्केट |
फुटपाथ गाडा | किराणा |
शॅक | भाजी-फळ |
जिम्नेशियम | कपडे शॉप |
ऑडीटोरिम | स्टेशनरी |
कम्युनिटी हॉल | सौंदर्यप्रसाधने |
सिनेमा थिएटर | इलेक्ट्रीकल |
स्विमींग पूल | इलेक्ट्रॉनिक |
नाईट क्लब | हार्डवेअर |
कॅसिनो | |
मंदिर | |
चर्च | |
मशीद |
प्रतिनिधी / पणजी
राज्यातील घाऊक आणि किरकोळ विक्री करणारी घाऊक दारुची दुकाने, केश कर्तनालये, प्रवासी वाहतूक आज सोमवारपासून सुरू करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. त्याचबरोबर सरकारी कार्यालये आजपासून पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहेत, मात्र मान्यता दिलेले सर्व व्यवसाय सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेतच सुरू ठेवता येतील. सायंकाळी 7 वाजल्यानंतर अत्यावश्यक वगळता राज्यातील सर्व प्रकारच्या हालचाली बंद असतील. कुणीही घराबाहेर पडू नये, अशी सूचना रविवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे.
गोवा लॉकडाऊनच्या तिसऱया टप्प्यात जात आहे. आतापर्यंत लॉकडाऊनच्या दोन टप्प्यात जनतेने सर्वप्रकारचे सहकार्य केले. आता तिसऱया टप्प्यात 17 मेपर्यंत नियम पाळून सहकार्य सहकार्य करावे. 3 एप्रिलनंतर राज्यात एकही कोरोना रुग्ण सापडलेला नाही. त्यामुळे गोवा ग्रीन झोनमध्ये सामाविष्ठ झाला आहे. यानंतरही गोवा सुरक्षित राखण्यासाठी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.
राज्यात 144 कलम 17 मे पर्यंत राहणार आहे. तसा आदेश उत्तर व दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱयांनी जारी केलेला आहे. त्यामुळे सायंकाळी 7 ते सकाळी 7 वाजेपर्यंत अत्यावश्यक वगळता कुणीही घराबाहेर पडून नये. 12 तास निर्बंध पाळावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
रेस्टॉरंट, हॉटेल्स, मॉल, सभागृहे, स्पा, मसाज पार्लर बंदच
ज्या व्यवसायाला खुले करण्यास मान्यता दिली आहे त्यापैकी अत्यावश्यक वगळता इतर व्यवसाय सायंकाळी 7 वाजता बंद करण्यात यावे. दारुची दुकाने 6 ते 6.30 वाजताच बंद करावीत, अशी सूचना केली आहे, मात्र रेस्टॉरंट, चहाची दुकाने, मॉल, सभागृहे, स्पा, मसाज पार्लर बंदच राहणार आहेत. त्यांनी काही काळ आपला व्यवसाय बंद ठेवावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
केशकर्तनालये खुली राहणार
छोटे चहाचे स्टॉल, पान शॉप, खाद्य पदार्थांचे स्टॉल, ढाबा, फुटपाथवरील गाडे 17 मेपर्यंत बंद ठेवावेत. जर जबरदस्तीने खुले करण्याचा प्रयत्न केला तर पोलीस कारवाई करतील. किनारी भागातील शॅक, जिम्नेशियम, ऑडीटोरिम, कम्युनिटी हॉल बंद ठेवावेत. तसेच सिनेमा हॉल, थिएटर, स्विमींग पूल, नाईट क्लब, कॅसिनो, स्पा, मसाज पार्लर बंद ठेवावे, मात्र केश कर्तनालये खुले राहणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
चर्च, मशीद, मंदिर बंद
राज्यातील मंदिरे, चर्च, मशीद लॉकडाऊन काळात बंद राहणार आहेत. तसेच शॉपिंगमॉल, करमणुकीची स्थळे बंद राहतील. या काळात 65 वर्षावरील इसमानी घराबाहेर पडूच नये. त्याचबरोबर 10 वर्षाखालील मुलांना घराबाहेर आणू नये, अशी सूचनाही देण्यात आली आहे. विलगीकरण सुविधा असलेली हॉटेल्स तेवढय़ापुरती चालू राहतील, मात्र अन्य हॉस्पिटॅलिटी सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. उल्लंघन करणाऱयांविरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. पान, गुटखा, तंबाखूची विक्री केली जाऊ नये. विक्री करताना सापडल्यास कारवाई केली जाणार आहे.
गोव्यात प्रवेश कणाऱया सर्वांचे विलगीकरण
बाहेरुन गोव्यात येणाऱया सर्व गोमंतकीयांचे सरकार स्वागत करीत आहे, मात्र त्यांना विलगीकरण विभागात एक ते दोन दिवस ठेवण्यात येणार आहे. अनेकजण अगोदर घरी जातात व नंतर तपासणीसाठी येतात त्यांनी तसे करू नये. कारण नंतर अहवाल पॉझिटिव्ह आला तर सगळेच अडचणीत येतील. गोव्यात येणाऱयांसाठी सकाळी 8 दुपारी 12 व रात्री 8 वाजता अशा तीन वेळा निश्चित केल्या आहे. ज्यांना वैयक्तिक वाहनाने गोव्यात यायचे असेल त्यांनी यावे, मात्र त्यांना एस्कॉर्ट पद्धतीने आणून विलगीकरण विभागात ठेवले जाणार आहे. त्यांना दिवसभर ठेऊन त्यांची चाचणी केली जाईल व चाचणी अहवाल नकारात्मक येताच त्यांच्या हातावर होम कॉरंटाईनचा शिक्का मारून त्यांना घरी पाठविण्यात येईल, मात्र त्यांनी घरात विलगीकरणातच रहायला हवे.
बाहेरुन येणाऱयांसाठी 14 दिवस होम कॉरंटाईन सक्तीचे
बाहेरुन येणाऱयांची जबाबदारी आता जास्त वाढली आहे. त्यांनी 14 दिवस घरात विलगीकरण विभागात रहायला हवे. कुणाच्याही संपर्कात येऊ नये. न पेक्षा त्यांना सरकारी विलगीकरण विभागात ठेवावे लागणार आहे. नियमांचे पालन करून गोवा सुरक्षित राखलेला आहे. यापुढे कोणताही धोका पत्करायचा नाही. त्यामुळे बाहेरून येणाऱयांनीही नियम पाळावे, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्याचबरोबर बाहेरुन कुणी आल्याचे माहित झाल्यास त्यांनीही सरकारला माहिती द्यावी.
दुचाकीवर 2, चारचाकीत 4 प्रवासी
आजपासून दुचाकी वाहनांवर दोन स्वारांना बसण्यास मान्यता दिली आहे. तर चारचाकी वाहनामध्ये चार प्रवाशांना बसण्यास मान्यता दिली आहे, मात्र मास्क वापरणे सक्तीचे आहे. त्याचबरोबर रिक्षा, टॅक्सीसेवा आजपासून सुरू करण्यास मान्यता दिली आहे. 17 मेपर्यंत कुणाही बाहेरील व्यक्तीला गोव्यात येण्यास परवानगी दिली जाणार नाही. एखाद्या कंपनीला किंवा सरकारला विशेष व्यक्तीला आणायचे असेल तर त्याला अगोदर विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. एखादी कंपनी अशा व्यक्तीला आणत असेल तर त्या कंपनीने त्या व्यक्तीला खासगी विलगीकरणात प्रतिदिन 2500 रुपये भरून ठेवावे लागेल. त्याच्याकडे गोव्याचा रहिवासी पुरावा नसेल तर त्याल विलगीकरणासाठी पैसे भरावे लगतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
कामगारांसाठी रेल्वे मंत्रालयाशी बोलणी
परराज्यांतली कामगारांना पुन्हा पाठविण्यासाठी रेल्वे मंत्रालयाशी बोलणी सुरू आहे. गोवा ते उत्तर प्रदेश असा प्रवास केला जाणार आहे. केवळ एकच स्टेशन या प्रवासासाठी ठेवले जाणार आहे. गोवा ते थेट उत्तर प्रदेश अशी वाहतूक होणार आहे. गोव्यात आता रस्ते, निचरा व्यवस्थापन, साबांखाची कामे सुरू झाली आहेत. त्यामुळे गोव्यात मजुरांची आवश्यकता आहे. म्हणूनच कंत्राटदारांनी आपल्या कामगारांना समजाविण्याचा प्रयत्न करावा, असेही मुख्यमंत्री म्हणाले
प्रवासी बसगाडय़ा आजपासून सुरू
गेले सुमारे दीड महिना बंद असलेल्या प्रवासी गाडय़ा आज सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, मात्र केवळ 50 टक्के क्षमतेने प्रवासी वाहतूक करावी लागणार आहे. सामाजिक दूरी राखण्यासाठी 50 टक्के प्रवासी बसगाडय़ातून न्यावे, असे सूचित करण्यात आले आहे.
सरकारी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरु होणार
राज्यातील सरकारी कार्यालये पूर्ण क्षमतेने चालू राहतील. त्यासाठी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाणार आहे. कार्यालयांमध्ये सेनिटायझर, थर्मल गनचा वापर केला जाणार आहे. कार्यालय सेनेटाईझ केले जाणार आहे. सरकारी कार्मचाऱयांनी आरोग्यसेतू ऍपचा वापर करणे आवश्यक आहे. 4 ते 5 लोकांपेक्षा जास्त जणांनी एकत्र येऊ नये. ज्या कर्मचाऱयांना थंडी, ताप, खोकला असेल त्याने कार्यालयात येऊ नये. सरकारी डॉक्टरची सर्टिफिकेट कार्यालय प्रमुखाला सादर करूनच नंतर सेवेत हजर व्हावे, अशी सूचनाही करण्यात आली आहे.
राज्यातील 71 हजार कामगार जाण्याच्या तयारीत
अन्य राज्यातील 71 हजार कामगारांनी गोवा सोडून आपल्या गावी जाण्यासाठी नोंदणी केली आहे. यापैकी 18 हजार कर्नाटकातील, 17 हजार उत्तर प्रदेशातील तर 11 हजार बिहारमधील आहेत. उर्वरीत अन्य राज्यातील आहेत. वेगवेगळय़ा ग्रामपंचायती, उपजिल्हाधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांच्यापाशी त्यांनी नेंदणी केली आहे. यानंतरही कुणाला गावी जाण्यासाठी नोंदणी करायची असल्यास त्यांनी पंचायतीकडे नोंदणी करावी व वाहनाचा नंबर द्यावा. त्यांना मान्यता दिली जाणार आहे. या एकूण प्रक्रियेसाठी अधिकारी कुणाल यांची नियुक्ती केली आहे.