प्रतिनिधी/ रत्नागिरी
मान्सून अर्थात नैत्य मोसमी वारे केरळात दाखल झाल्यानंतर त्यांची आगेकूच जोमाने सुरु आहे. इतकेच नव्हे तर महाराष्ट्राच्या वेशीवर हे वारे आले आहेत. त्यामुळेच हवामान विभागाकडून प्राप्त माहितीनुसार 4 ते 7 जूनदरम्यान कोकणात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
रत्नागिरी शहरात 2 जून रोजी आकाशात मोठय़ा प्रमाणात काळ्य़ा ढगांची दाटीवाटी झाली होती. शिवाय सोसाटय़ाचा वाराही सुटला होता. यामुळे काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे मात्र नागरिकांची तारांबळ उडाली. सध्या पूर्वमोसमी पावसाचे वातावरण जिल्हाभरात दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या मासेमारीसाठी खोल समुद्रात जाणाऱया नौका बंदराच्या आश्रयाला आल्या आहेत.
पूर्वमोसमी पावसासाठी पोषक वातावरण
सध्या अंदमान समुद्र व परिसरावर चक्राकार स्वरूपाचे वारे वाहत असून उत्तर प्रदेशापासून नागालॅण्डपर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा पूर्व-पश्चिम अशा रितीचा सक्रिय आहे. शिवाय बंगाल ते आंध्रप्रदेशपर्यंत आणखी एक हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. या सर्व स्थित्यंतरामुळे राज्यात पूर्वमोसमी पावसासाठी अनुकुल वातावरण निर्म़ाण झाले आहे. यामुळे कोकणात काही दिवस पावसाचे वातावरण असण्याची शक्यता नाकारता येत नाही.









