टाळेबंदीमुळे सध्या वेगवेगळय़ा मनोरंजन वाहिन्यांवरून प्रसारित होणाऱया मालिकांचे नवे एपिसोड बघायला मिळत नाहीत. आता अनेक अटी-शर्तींसह शूटिंगला मान्यता दिलेली असली, तरी निर्माता-दिग्दर्शकांना बऱयाच अडचणींचा सामना करावा लागत आहे. 65 वर्षांच्या वरील कलावंतांना शूटिंगमध्ये भाग घेण्यास मनाई आहे. त्यामुळे ते घरच्या घरीच काही शॉट्स चित्रित करणार आहेत. मात्र नवे एपिसोड बघायला मिळत नसल्यामुळे प्रेक्षकांची निराशा झाली. आजकाल तर केवळ टीव्ही मालिकाच नव्हे, तर ओटीटीवर प्रसारित होणाऱया वेब सिरीजचे प्रस्थ बरेच आहे. 15 मे 2020 पासून अमॅझॉन प्राइम व्हीडिओवर क्लीन स्लेट फिल्म्स निर्मित हिंदीत ‘पाताललोक’ नावाची वेब सीरिज प्रसारित होऊ लागली आहे. तरुण तेजपाल यांच्या 2010 सालच्या ‘द स्टोरी ऑफ माय असेसिन्स’ या कादंबरीवर ती आधारलेली आहे. त्यात ‘राजी’ या चित्रपटातील अभिनयामुळे गाजलेला जयदीप अहलावट, गुल पनाग, नीरज काबी, स्वस्तिका मुकर्जी ईक्ष्वकसिंग आणि अभिषेक मुकर्जी यांच्या भूमिका आहेत. द हफ पोस्ट इंडिया आणि इंडियन एक्सप्रेसने चालू वर्षातील ही सर्वोत्कृष्ट वेब सिरीज असल्याचा गौरव केला आहे. स्वर्ग, धरती आणि पाताळ या रूपकांचा वापर वेगवेगळय़ा समाजातील वर्गांशी करून, ही इन्व्हेस्टिगेटिव्ह थ्रिलर सिरीज रचण्यात आली आहे. या मालिकेची पटकथा सुदीप शर्माने लिहिली असून, त्यासाठी त्याने दोन वर्षे मेहनत घेतली. त्याला हार्दिक मेहता, गुणजित चोप्रा आणि सागर हवेली याही नव्या लेखकाने लिखाणात मदत केली. दिल्ली व उत्तर प्रदेशात वेगवेगळय़ा ठिकाणी फिरून त्यांनी मालिकेसाठी संशोधनही केले. प्रोसित राव आणि अविनाश अरुण धावरे यांनी ही मालिका दिग्दर्शित केली असून, विशेष म्हणजे भारतातील 110 शहरात जाऊन तिचे चित्रीकरण करण्यात आले आहे.
इन्स्पेक्टर हाथीराम चौधरी हा दिल्लीतला एक पोलीस अधिकारी आहे. त्याचे करियर तसे सामान्यच आहे. परंतु एक दिवस त्याच्या टेबलवर एक हाय प्रोफाईल केस येते. केसचा शोध लावता लावता, तो पाताललोक म्हणजे अंडरवर्ल्डच्या जगात प्रवेश करतो. त्याला अनेक नवनव्या आतल्या गोष्टी कळतात. त्यामधून त्याला पोलीस म्हणून आपल्यावर असलेल्या जबाबदारीची जाणीव होते. आयुष्याचा अर्थही त्याला गवसतो. हाथीरामच्या मते, लोक एक नसून, तीन लोक आहेत. स्वर्गात देवता राहतात आणि स्वर्ग सगळय़ात वर असतो. मध्ये भूलोक आहे, जिथे सामान्य लोक राहतात. सगळय़ात खाली पाताललोक आहे, जिथे किडेमुंग्या राहतात. ही कहाणी घडते दिल्लीत. यमुनेच्या पुलावर चारजणांना प˜ाढडले जाते. प्रसिद्ध पत्रकार आणि न्यूज अँकर संजीव मेहराच्या (नीरज काबी) खुनात ते सहभागी असतात. हाथीरामकडे (जयदीप) हे प्रकरण येते. अनेक वर्षांच्या सेवेत त्याने कोणतेही कर्तृत्व गाजवलेले नाही. हाथीरामचा मुलगा सिद्धार्थ (बोधिसत्त्व शर्मा) वडिलांशी नीट बोलतही नाही. संजीव हे प्रसारमाध्यमातले नामवंत नाव असले, तरी तो आपली नोकरी वाचवण्याच्याच प्रयत्नात असतो. त्यात स्वतःच्या खुनाच्या कटाची वार्ता कानी येताच, त्याला धक्का बसतो. पकडलेल्या चारही गुन्हेगारांच्या मागचे सत्य खतरनाक असते. त्याच्यात केवळ पाताललोकाचे दर्शनच घडत नाही, तर या जगातील सर्व त्रासांचेही दर्शन घडते.
आज केवळ भारतातच नाही, तर जगात जे काही घडत आहे, त्याचे प्रतिबिंबच या मालिकेत पडले आहे. व्हॉट्सअपमधून येणारे संदेश कसा बुद्धिभेद घडवतात, यावर सुरुवातीलाच एक टोमणा मारण्यात आला आहे. हाथीराम आपल्या सहकाऱयांना त्रैलोक्मयाची कल्पना समजावून सांगताना म्हणतो, ‘वैसे तो ये शास्त्राsं में लिखा है, पर मैंने व्हॉट्सअपपर पढा है’… हाथीराम हा सहिष्णू असल्याचे दाखवण्यात आले असले तरी, आरोपी कबीरची चौकशी करताना तो अपमानकारक शब्द वापरतो. जेव्हा समाजात विद्वेष पसरतो, तेव्हा सहिष्णू लोकांची मने व भाषा कशी बदलतात हे दाखवण्यात आले आहे. ज्या भाषेत उलटतपासणी घेण्यात येते, त्यामुळे अन्सारी अस्वस्थ होतो आणि नंतर हाथीरामही त्याच्याजवळ दिलगिरी व्यक्त करतो. आपल्याकडे नेहमी घडते, त्याप्रमाणे या मालिकेतील संबंधित प्रकरण सीबीआयकडे सोपवले जाते. तिथे कबीर आणि इतरांवर जिहादी दहशतवादी कट रचल्याचा आरोप ठेवला जातो. एका प्रभावशाली राजकारण्याच्या आदेशानुसार दिल्ली पोलिसांनी तपासाची व्यूहरचना केल्याचे हाथीरामच्या लक्षात येते. भ्रष्टाचार, तडजोडी, नाना क्लृप्त्या यामुळे तपाससंस्थांचा कारभार कसा सडलेला आहे, हेही या मालिकेतून दाखवण्यात आले आहे. अन्सारी हा पोलीस ठाण्यातील अत्यंत तळमळीने काम करणारा अधिकारी आहे. परंतु त्याच्या कामात थोडीही चूक झाली, तरी त्याच्या पाठीमागे त्याचा धर्म काढला जातो. कधी त्याच्या तोंडावरसुद्धा मुसलमान म्हणून त्याची संभावना केली जाते. रात्री उशिरापर्यंत काम केल्यानंतर अन्सारीला जेव्हा डुलकी लागते, तेव्हा त्याचे सहकारी पोलीस ठाण्यातील देवासमोरची घंटा जोरजोरात वाजवून त्याला जागे करण्याचा प्रयत्न करतात. ही सौम्य, पण छळवणूकच असते. जेव्हा अन्सारी यूपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण होते, तेव्हा त्याचे अभिनंदन करताना सीबीआय अधिकारी म्हणतो, ‘आजकल इनकी कम्युनिटी से काफी आ रहे हैं ना देखना, इशसस इनकी कम्युनिटी की इमेज अपने आप ही चेंज हो जाएगी.’ यातून तो असे ध्वनित करतो, की यांच्या समाजातच काही चुकीचे घडते आहे आणि ते दुरुस्त करण्याची गरज आहे. अन् ही जबाबदारी मुस्लिम समाजाचीच आहे. मालिकेतील आरोपी टोपीसिंग हा पंजाबमधील एका खेडय़ात राहणारा कनि÷ समजल्या जाणाऱया जातीचा माणूस आहे. वरच्या जातीचे लोक त्याची सतावणूक करतात. त्यामुळे चिडून तो तिघा जणांना भोसकतो आणि गुन्हेगारी विश्वात प्रवेश करतो. अनेक जातींचे लोक ‘आपापल्या’ माणसांनाच मदत कशी करतात, तसेच व्यक्तीची प्रति÷ा व जीवनमानाचा दर्जा तो कोणत्या जातीतून आला आहे, यावर कसा ठरतो, हेही दाखवण्यात आले आहे. मालिकेतले एक महत्त्वाचे पात्र कबीर, याला उर्दू वाचता येत नाही. त्याने आपले मुस्लिमपण सोडूनच दिले आहे. अशा व्यक्तीला एका न्यूज अँकरचा खून करण्यासाठी पाकिस्तानने धाडल्याचा आरोप केला जातो. कबीरच्या अब्बांची उलटतपासणी हाथीराम घेतो, तेव्हा ते म्हणतात, ‘क्मया साहब, जिसे मैंने मुसलमान तक बनने नहीं दिया, उसे आपने जिहादी बना दिया’.
या मालिकेसाठी आपला फोटो वापरण्यात आल्याबद्दल, गाझियाबादेतील भाजप आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी पोलिसात तक्रार केली आहे. ‘पाताललोक’मध्ये सनातन धर्मातील काही जाती व हिंदू संघटनांबद्दल नकारात्मक सूर असून, ती देशविरोधी असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. प्रसिद्धीसाठी अशा तक्रारी केल्या जातात आणि थोडय़ाच दिवसात त्या पाताळात धाडल्या जातात. ‘पाताललोक’मध्ये मुसलमानांबद्दलचे पूर्वग्रह, पोलीस तपासातील राजकारण याचे अतिशय प्रत्ययकारी चित्रण करण्यात आले आहे. वेब सिरीज किंवा टीव्ही मालिका या एकता कपूरच्या ढाच्यातल्या म्हणून निर्बुद्ध असतात, असा एक प्रचलित समज आहे. इतर काही मालिकांप्रमाणेच ‘पाताललोक’मुळे वेब सिरीजमध्ये स्वर्गलोक अवतरला आहे.
नंदिनी आत्मसिद्ध








