प्रतिनिधी / अक्कलकोट
रविवार २१ जून सारखे कंकणाकृती सुर्यग्रहण पुन्हा पाहण्यासाठी खगोलप्रेमींना दहा वर्षे वाट पाहावे लागणार आहे. कोणत्याही अंधश्रधेला बळी न पडता खगोलीय घटनांचा नागरिकांनी निरीक्षण केले पाहिजे. यातुनच भविष्यकाळातील खगोलीय शास्त्रज्ञ निर्माण होतील असे प्रतिपादन खगोलप्रेमी व सोलापूर विज्ञान केंद्राचे समन्वयक शावरसिद्ध पाटील यांनी केले. आचेगांव येथील श्री शावरसिद्ध हायस्कूल आचेगावचे क्रीडा व खगोलप्रेमी शिक्षक व सोलापूर विज्ञान केंद्राचे समन्वयक शावरसिद्ध आप्पाराव पाटील यांनी खंडग्रास सूर्यग्रहण पाहण्यासाठी आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले. आपल्या स्वतःच्या घरावर लावण्यात आलेल्या अद्यावत दुर्बिण मधुन काही मोजक्या लोकांना व विद्यार्थ्यांना खंडग्रास सुर्यग्रहण पाहण्याची संधी निर्माण करून दिली.यावेळी बोलताना शावरसिद्ध पाटील म्हणाले विद्यार्थ्यांना माहिती देण्यापेक्षा अनुभव दिला पाहिजे. कंकणाकृती सूर्यग्रहण ही एक दुर्मिळ खगोलीय घटना असते. सूर्य व पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र आला तर सूर्यग्रहण होत असतो. कंकणाकृती सूर्यग्रहणात चंद्र व पृथ्वी यांच्यातील अंतर जास्त असल्याने चंद्रबिंब आकाराने लहान दिसतो व तो संपूर्ण सूर्य झाकून टाकून टाकु शकत नाही. त्यामुळे सूर्याचा गोलाकार कडा तयार होतो. यालाच कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात. रविवार २१ जून रोजी ही अवस्था भारताच्या राजस्थान, पंजाब, हरियाणा व उत्तराखंड राज्यातील काही प्रदेशातून दिसला तर उर्वरित भारतातून खंडग्रास सुर्यग्रहण दिसला. २१जुन या दिवसाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा दिवस सौर वर्षातील सर्वात मोठा दिवस असून, १३ तासांचा दिवस व १३ तासांची रात्र आहे.
२१ जून पासून सूर्य उत्तरायणाची परिक्रमा संपून दक्षिणायनाला सुरुवात करतो. योगायोगाने याच दिवशी सूर्यग्रहण असून सकाळी १० वाजून ३ मिनिटांनी ग्रहणाला सुरुवात होऊन दुपारी १ वाजून ३३ मिनिटांन ग्रहण संपले. यामध्ये सूर्य हा जवळपास ७० टक्के झाकला गेला होता. पुढे भारतातून पुन्हा कंकणाकृती सुर्य ग्रहण पाहण्याचा योग २१ मे २०३१ रोजी येईल.तर महाराष्ट्रातून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसण्याचा योग ३ नोव्हेंबर २४०४ रोजी येणार आहे. संपूर्ण आयुष्यात क्वचितच कंकणाकृती सुर्यग्रहण पाहण्याचा योग येत असतो. अशा अमोल संधीकडे वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहून आनंद घ्यावा. या वैज्ञानिक युगात देखील ग्रहणाबद्दल अनेक अंधश्रद्धा मनात आहेत. पण ही एक दुर्मिळ खगोलीय घटना आहे. कोणतीही अंधश्रद्धा मनात न बाळगता, आपण शास्त्रोक्त चष्म्यातून किंवा १४ क्रमांकाच्या वेल्डिंग काचेतुन सूर्य ग्रहण पहावे. उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहिल्यास डोळ्यांना इजा होऊ शकते हे माहीत असावे. सध्याची स्थिती पाहता सोशल डिस्टन्स चे पालन करून, या संपूर्ण खगोलीय घटनेचा आपण आपल्या कुटुंबासमवेत आनंद घ्यावा असे आवाहन शावरसिद्ध पाटील यांनी केले आहे.
सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून तसेच मास्क,सॅनिटायझर व थर्मल स्कॅनर वापरून आचेगांव येथे हा सुर्यग्रहण दाखविले. यावेळी अमोघसिद्ध पाटील, योगेश कबाडे, सागर कोळी,दिनकर नारायणकर, नितीन आळगी, सिद्धु पाटील, सुदर्शन जवळकोटे, शिलीसिद्ध खांडेकर यांच्यासह विद्यार्थ्यांनी सुर्यग्रहण अनुभवले.काही नागरिकांच्या आग्रहास्तव फेसबुक लाईव्ह करून घरी बसल्या सुर्यग्रहण बघण्याची संधी उपलब्ध करून दिली.याचा लाभ हजारो विद्यार्थी, पालक, शिक्षक खगोलप्रेमींनी घेतला .