तब्बल सात वर्षानंतर न्यायालयाने दिला न्याय
प्रतिनिधी/ बेळगाव
विधानसभा निवडणुका तोंडावर असताना गुढी पाडव्याच्या सणानिमित्त शहरात ‘मी मराठी’ असे भगवे ध्वज सर्वत्र लावण्यात आले होते. याप्रकरणी माजी महापौर सरिता पाटील यांच्यावर निवडणूक अधिकाऱयांनी अचारसंहितेचा भंग केला म्हणून गुन्हा नोंदविला होता. या खटल्याची सुनावणी न्यायालयात सुरू होती. तब्बल सात वर्षे हा खटला चालला. त्यानंतर शुक्रवारी या खटल्याचा निकाल लागला असून माजी महापौर सरिता पाटील यांना न्यायालयाने निर्दोष ठरविले आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला.
विधानसभा निवडणूका 2013 मध्ये होत्या. त्यावेळी 2 मे 2013 रोजी शहरामध्ये विविध ठिकाणी भगवे ध्वज लावण्यात आले. त्या भगव्या ध्वजावर ‘मी मराठी’ असा उल्लेख करण्यात आला होता. नेहमीच मराठी भाषिकांवर वाकडी नजर ठेवणाऱया अधिकाऱयांनी हीच संधी साधत माजी महापौर सरिता पाटील यांच्यावर खडेबाजार पोलीस स्थानकामध्ये रात्री 2 वाजता आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल केला. मात्र नेहमीच मराठीसाठी झगडणाऱया या रणरागिणीने त्याला जुमानले नाही.
निवडणूक अधिकारी राजश्री जैनापुरे यांनी तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी कलम 248(1), सीआरपीसी 171(एफ), कलम 3, 4 आणि 5 अन्वये गुन्हा दाखल केला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी तृतीय न्यायालयात सरिता पाटील यांच्यावर दोषारोप दाखल करण्यात आले. या रणरागिणीने कधीच न्यायालयाची पायरी चढली नव्हती. मात्र या आचारसंहिता भंगच्या खटल्यासाठी न्यायालयाच्या पायऱया त्यांना चढाव्या लागल्या. तब्बल सात वर्षे यासाठी त्यांना न्यायालयात धाव घ्यावी लागली.
विधानसभेची दुसरी निवडणूक झाली तरी या खटल्याचा निकाल लागला नव्हता. केवळ तारीखवर तारीख देण्यात आली. मात्र सरिता पाटील यांनी त्या विरोधात लढाई लढली. त्यांच्यावतीने ऍड. रतन मासेकर यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद केला. त्याला यशही आले आणि न्यायालयाने सरिता पाटील यांना निर्दोष ठरविले. निर्दोष झाल्यानंतर त्यांचे शहर म. ए. समितीचे अध्यक्ष किरण ठाकुर यांनी व इतर म. ए. समितीच्या नेत्यांनी तसेच मराठी भाषिकांनी अभिनंदन केले आहे.









