प्रतिनिधी /बेळगाव
आचार्य विनोबाजी यांचे शिक्षणाविषयीचे विचार आजही लागू पडतात. आजचे शिक्षण अभ्यास नाही आभास आहे, असे ते म्हणत. ते कर्मयोगी, प्रयोगशील, विज्ञानवादी, म.गांधींचे पहिले सत्याग्रही, जेलमध्ये स्वतःचे आणि इतर सहकैद्यांचेही काम करणारे, अद्वैत वादावर विश्वास, आध्यात्मिक, भरपूर वाचन-अभ्यास, कारागृहाचा आश्रम करणारे आधुनिक संत, भूदानसाठी पदयात्रा, ब्रम्हचर्य पालणारे, हृदय परिवर्तनावर विश्वास, भारतरत्न-मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित, गीताई-गीतावर प्रवचने व लेखन करणाऱया आचार्यांचा गागोदे येथील जन्म, बडोदे येथे उच्चशिक्षण ते वर्धा-पवनार आश्रमचा अद्भुत प्रवास, गांधी-अरोबिंदोंचा प्रभाव, अध्यात्म की क्रांतीकार्य असा विचार व शेवटी 1.11.1982 ते 15.11.1982 असे प्रायोपवेशन करून-जय जगत म्हणणाऱया या संताच्या जीवनयात्रेची जीवन कहाणी नीला आपटे यांनी सुंदर व ओघवत्या शब्दात मांडली.
लोकमान्य ग्रंथालयाच्या सानेगुरुजी सभागृहात बुधवारी सायंकाळी हा कार्यक्रम झाला. प्रारंभी लोकमान्य ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष जगदीश कुंटे यांनी पुस्तक देऊन स्वागत तर उज्ज्वला काकडे यांनी परिचय करून दिला. बुलकचे सचिव किशोर काकडे यांनी प्रास्ताविक-सूत्रसंचालन आणि आभार व्यक्त केले. काकडे परिवारातर्फे नीला आपटे यांचे भेटवस्तू देऊन कौतुक करण्यात आले.
नंतरच्या चर्चेत शिवाजी कागणीकर, सुनीता पाटणकर, जगदीश कुंटे, प्रतिभा आपटे आदींनी आपले अनुभव मांडले. श्रोत्यांच्या प्रश्नांना नीला आपटे यांनी उत्तरे देत विनोबांच्या जीवनाचे आणखी पैलू उलगडून दाखविले. आजादी का अमृतमहोत्सव साजरा होत असताना उपस्थित श्रोत्यांनी एका अभ्यासू भाषणातून विनोबाजींसारख्या देशभक्त-संताची अज्ञात माहिती मिळविली व निश्चितच आनंद घेतला.









