प्रतिनिधी / बेळगाव
रविवारी सकाळी 8 वाजता मतमोजणी प्रक्रियेला प्रारंभ झाला. मोजणीची प्रक्रिया संथगतीने सुरू होती. सुरुवातीला सकाळी काँग्रेसचे सतीश जारकीहोळी यांनी आघाडी घेतली होती. त्यानंतर मंगला अंगडी यांनी तब्बल 41 फेरीअखेरपर्यंत सुमारे 8 ते 10 हजार मतांची आघाडी ठेवली होती. त्यानंतर सतीश जारकीहोळी यांनी पुन्हा आघाडी घेत 55 फेऱयांपर्यंत सलग मुसंडी मारली आणि 9 हजार 975 मतांची आघाडी मिळविली होती. त्यानंतर अचानकपणे सतीश जारकीहोळी यांचे मताधिक्य कमी झाले, ते 7 हजार 163 वर आले. त्यानंतर खाली घसरत 4999 पर्यंत आले होते. अशा रितीने दोन्ही उमेदवार काही वेळ आघाडी मिळवत होते तर काही वेळाने पिछाडीवर जात होते. अखेर भाजपच्या मंगला अंगडी बाजी मारत विजयी झाल्या.
सर्व्हर डाऊनमुळे निवडणूक अपडेट थांबले
लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरळीत सुरू असतानाच दुपारी 12.30 वा. सर्व्हर डाऊन झाले. त्यामुळे निवडणूक वेबसाईटवरून मिळणारे अपडेट काही काळ थांबले. मतमोजणीचे निकाल बराच वेळ बाहेर न आल्याने काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. तब्बल तासभर सर्व्हर डाऊनमुळे गोंधळ सुरू होता. परंतु या काळात मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पद्धतीने सुरू होती, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. हरिषकुमार यांनी माध्यमांना दिली.
अखेरच्या टप्प्यात पावसाची हजेरी
मतमोजणीमध्ये अत्यंत कमी मतांनी उमेदवार एकमेकांपेक्षा वरचढ ठरत असल्याने सर्वांनाच उत्कंठा लागली होती. शेवटच्या क्षणापर्यंत ही उत्कंठा वाढत गेली. शेवटच्या फेऱयांची मतमोजणी सुरू असतानाच वरुणराजाचे आगमन झाले. वळिवाच्या पावसाचे विजांच्या कडकडाटासह आगमन झाले. यामुळे एकीकडे उत्कंठा शिगेला पोहोचली असताना दुसरीकडे विजांचा कडकडाट सुरू असल्याचे चित्र दिसून आले.
कोरोनाने कार्यकर्ते घरात
निवडणूक मतमोजणी म्हटली की कार्यकर्त्यांचा जल्लोष, फटाक्मयांची आतषबाजी, गुलालाची उधळण असे वातावरण असते. परंतु यावेळी मात्र कोरोनाचे सावट असल्याने या सर्वावर निर्बंध आले. पहिल्यांदाच कार्यकर्ते घरी राहून आपल्या प्रतिक्रिया, आपला आनंदोत्सव साजरा करीत होते. यापूर्वीच राज्य सरकारने विजयोत्सव साजरा करण्यावर निर्बंध घातल्याने विजयोत्सव साजरा करण्यात आला नाही. मतमोजणी केंद्राच्या बाहेर सर्वत्र शुकशुकाट व पोलीस बंदोबस्त दिसून आला.
प्रथमच पोटनिवडणुकीची उत्कंठा वाढली
बेळगावचे खासदार तथा माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनाने निधन झाले. यामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. दिवंगत सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. काँग्रेसकडून सतीश जारकीहोळी यांना उमेदवारी जाहीर झाली. ही निवडणूक एकतर्फी दिसून येत असताना यामध्ये म. ए. समितीने उडी घेतली. मध्यवर्ती म. ए. समितीने शुभम शेळके यांना उमेदवारी दिल्याने ही तिरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले होते. पोटनिवडणूक तितक्मया चुरशीने व उत्कंठेने होत नसल्याचे यापूर्वी दिसून आले आहे. परंतु या तिरंगी लढतीमुळे इतिहासात प्रथमच पोटनिवडणुकीत उत्कंठा वाढली होती.
तरुण भारतमुळे घरबसल्या मिळाले अपडेट
तरुण भारतने आपले वाचक व दर्शकांसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून घरबसल्या निवडणूक मतमोजणीचे अपडेट दिले. तरुण भारतच्या यू-टय़ूब चॅनेलच्या माध्यमातून 9 तास मतमोजणीचे प्रक्षेपण केले जात होते. नागरिकांना काही क्षणात अपडेट मिळत असल्याने तरुण भारतच्या फेसबुक, यू-टय़ूब चॅनेलवर व्हय़ू वाढत होते. 9 तासांच्या कालावधीत तब्बल लाखांहून अधिक दर्शकांनी यू-टय़ूबवर अपडेट पाहिले. तरुण भारतने क्षणार्धात अपडेट दिल्याने कमेंटच्या माध्यमातून प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला.









