ग्रामपंचायत निवडणूक सावंतवाडी तालुका : भाजप, दीपक केसरकरांच्या भूमिकेकडे लक्ष :
11 ग्रा. पं. वर सत्तेसाठी होणार रस्सीखेच
विजय देसाई / सावंतवाडी:
सावंतवाडी तालुक्यात 11 ग्रामपंचायतींच्या निवडणुका 15 जानेवारीला होत आहे. या ग्रामपंचायतींपैकी बहुसंख्य ठिकाणी सध्या शिवसेनेची सत्ता होती. त्यामुळे पुन्हा सत्तेसाठी शिवसेनेचा प्रयत्न राहणार आहे. तर गेल्या निवडणुकीत तळवडेची ग्रामपंचायत शिवसेनेच्या हातून गेली होती. ती पुन्हा खेचून आणण्याचा शिवसेनेचा प्रयत्न राहणार आहे. तालुक्यात आता या ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढविताना राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी असल्याने या पक्षांना शिवसेना कशी सामावून घेणार, हे पाहावे लागणार आहे. आघाडी झाल्यास शिवसेनेला ही लढाई अधिक सोपी जाणार आहे. तर भाजप आपली ताकद पणाला लावून शिवसेनेकडून या ग्रामपंचायतींवर आपली सत्ता आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. मात्र, भाजप ग्रामपंचायतींची जबाबदारी कुणाकडे सोपविणार, यावर त्यांचे यश अवलंबून राहणार आहे. सध्या भाजपची सत्ता असलेल्या ग्रामपंचायती नारायण राणे काँग्रेसमध्ये असताना लढवून आल्या होत्या. त्यात तळवडे, डिंगणेचा समावेश आहे. या निवडणुकीत आमदार दीपक केसरकर यांचा कस लागणार आहे. त्यामुळे ते कशी रणनीती आखणार, ते महत्वपूर्ण ठरणार आहे.
सावंतवाडी तालुक्यात आंबोली, चौकुळ, मळेवाड, तळवडे, आरोंदा, कोलगाव, मळगाव, इन्सुली, आरोस, दांडेली, डिंगणे या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. सध्या या ग्रामपंचायतीवर प्रशासक आहे. यापैकी आरोस, दांडेली, डिंगणे वगळता इतर आठ ग्रामपंचायती मोठय़ा लोकसंख्येच्या आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायतीवर सत्तेसाठी शिवसेना आणि भाजपचा प्रयत्न राहणार आहे. तळवडे, डिंगणे वगळता सर्व ग्रामपंचायतींवर शिवसेनेची सत्ता आहे. तळवडेत गेल्यावेळी प्रकाश परब यांना धक्का देत काँग्रेसने सत्ता आणली होती. मात्र, नंतर सर्वांनी भाजपची कास धरल्याने तेथे भाजपची सत्ता आली. ही ग्रामपंचायत आपल्या हातून निसटल्याची खंत दिवंगत प्रकाश परब यांना होती. त्यामुळे शिवसेना आता या ग्रामपंचायतीवर पुन्हा सत्ता आणून परब यांना असलेले शल्य दूर करण्याचा कसोशीने प्रयत्न करणार आहे.
या गावाने विधानसभा निवडणुकीत आमदार केसरकर यांना नेहमी साथ दिली. मात्र, गतवेळी ग्रामपंचायत हातून निसटली होती. तेथे आता सत्ता आणण्याचा केसरकर यांचा प्रयत्न राहणार आहे. त्यांचा हा प्रयत्न कितपत यशस्वी होतो, हेही महत्वपूर्ण ठरणार आहे. कारण माजी पं. स. सभापती आणि विद्यमान पं. स. सदस्य भाजपचे पंकज पेडणेकर या गावातील आहेत. त्यांचीही प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
कोलगावची लढत लक्षवेधी
कोलगाव येथे शिवसेनेचे जि. प. सदस्य मायकल डिसोजा आणि भाजपचे महेश सारंग यांच्या दृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. या ग्रामपंचायतीवर डिसोजा यांचे वडील फ्रान्सीस डिसोजा यांचे पूर्वी वर्चस्व होते. या वर्चस्वाला महेश सारंग यांनी धक्का दिला होता. त्यानंतर फ्रान्सीस डिसोजा आणि मायकल डिसोजा या पितापुत्रांनी पुन्हा सारंग यांच्या वर्चस्वाला धक्का देत पुन्हा सत्ता मिळविली. त्यासाठी विद्यमान पं. स. सदस्य मेघ:श्याम काजरेकर यांनी साथ दिली होती. पूर्वीचीच लढाई येथे होणार आहे.
मळगावला शिवसेना-भाजप चढाओढ
मळगावला शिवसेनेची सत्ता होती. मात्र, तेथे भाजपचा सरपंच नंतर झाला. या सरपंचांना भाजपच्या सदस्यांनी पायउतार केल्यानंतर तेथे शिवेसेनेचा सरपंच आणि भाजपचा उपसरपंच बसला होता. आता पुन्हा शिवसेना आणि भाजपची लढाई येथे पाहायला मिळणार आहे. शिवसेनेचे विद्यमान तालुकाध्यक्ष रुपेश राऊळ यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. मागच्या निवडणुकीत जिल्हा बँक माजी संचालक दिलीप सोनुर्लेकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने निवडणूक लढविली होती. आता त्यांच्या निधनाने या ठिकाणी शिवसेनेला अधिक ताकद दाखवावी लागेल.
आंबोली, चौकुळ
आंबोली, चौकुळ ग्रामपंचायतीवर शिवसेनेची सत्ता आहे. या ग्रामपंचायतीवर झेंडा फडकविण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. शिवसेनेच्या रोहिणी गावडे जि. प. सदस्या आहेत. तर पंचायत समितीही शिवसेनेकडे आहे. केसरकर यांचा या भागाशी सातत्याने संपर्क असतो. त्यामुळे येथे सत्ता आणण्यासाठी शिवसेनेला फारशी ताकद लावावी लागणार नाही. भाजपचे आत्माराम पालयेकर आणि गजानन पालयेकर बंधू येथे भाजपची सत्ता आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
इन्सुलीत टक्कर
इन्सुली येथे यावेळी भाजप आणि शिवसेना यांच्यात ‘काँटे की टक्कर’ होणार आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे या गावातील असल्याने शिवसेना काँग्रेसला किती संधी देणार, यावर शिवसेनेचे यशापयश अवलंबून राहणार आहे. काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढविल्यास मतांचे विभाजन भाजपच्या पथ्यावर पडू शकेल. भाजपचे जिल्हा बँक संचालक गुरुनाथ पेडणेकर, सभापती मानसी धुरी, शिवसेनेचे माजी पं. स. सदस्य नारायण राणे, उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी, काँग्रेसचे बाळा गावडे यांची या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
मळेवाड, आरोंदा
मळेवाड, आरोंदा ग्रामपंचायती शिवसेनेकडे होत्या. या ग्रामपंचायतीत शिवसेना आणि भाजप अशीच लढाई होणार आहे. मळेवाडमध्ये शिवसेनेचे विद्यमान जि. प. सदस्य राजन मुळीक तर आरोंद्यात भाजपच्या जि. प. सदस्या शर्वाणी गावकर यांच्या दृष्टीने ही निवडणूक महत्वाची आहे.
आरोस, दांडेली
आरोस, दांडेली येथे शिवसेनेची सत्ता होती. तेथे शिवसेना आणि भाजप अशी लढत होणार आहे. शिवसेनेचे सावंतवाडी संपर्कप्रमुख राजू नाईक यांच्या पत्नी या भागात पंचायत समितीवर नेतृत्व करतात. त्यामुळे नाईक या ग्रामपंचायती शिवसेनेकडे राहण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. तर डिंगणेत जि. प. माजी सदस्य भाजपचे प्रमोद कामत हे ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व राखण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
एकंदरित तालुक्यात शिवसेना आणि भाजप अशी लढाई होणार असली तरी शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार करावा लागणार आहे. तालुक्यात आमदार केसरकर आणि भाजपचे सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.









